“ही तर लवकर निवडणुका घेण्याची तयारी”; ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर नितीश कुमारांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 09:56 AM2023-09-02T09:56:50+5:302023-09-02T09:57:28+5:30
Nitish Kumar Reaction on One Nation One Election: इंडिया आघाडीच्या मुंबई बैठकीनंतर पाटणा येथे पोहोचताना नितिश कुमार यांनी वन नेशन, वन इलेक्शनवरून केंद्रावर टीका केली.
Nitish Kumar Reaction on One Nation One Election: केंद्र सरकारने ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’च्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्याच्या एका दिवसानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी टीका केली. मुंबईतील इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी पाटणा येथे पोहोचताच ‘वन नेशन, वन इलेक्शन’संदर्भात केंद्रावर निशाणा साधत, हे मुदतपूर्व निवडणुकांचे संकेत असल्याचा दावा केला आहे.
मीडियाशी बोलताना नितिश कुमार म्हणाले की, मुंबईतील इंडिया आघाडीची तिसरी बैठक खूप चांगली झाली. सर्वांनी मिळून एकत्रितपणे चर्चा केली. अनेक गोष्टी ठरवल्या गेल्या आहेत. आम्हाला आता गतीने कामे करावी लागतील. केंद्र सरकार मुदतपूर्व निवडणुका घेण्याच्या तयारी असल्याचे दिसत आहे. यामुळे इंडिया आघाडीला एकजुटीने काम करावे लागेल, असा नितिश कुमार यांनी स्पष्ट केले.
‘वन नेशन, वन इलेक्शन’ म्हणजे लवकर निवडणुका घेण्याची तयारी
‘वन नेशन, वन इलेक्शन’वर बोलताना नितिश कुमार म्हणाले की, लोकसभेचे अधिवेशन बोलावले जाते. याचा अर्थ लवकरच निवडणुका घेणे असाच आहे. सन २०२० मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. पण ती झाली नाही. जातनिहाय जनगणना न होणे ही वेगळी बाब आहे. तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या सर्व गोष्टी सभागृहात बोलल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी न झाल्याबाबत प्रश्न विचारायला हवेत, असे नितिश कुमार यांनी सांगितले.
दरम्यान, एक देश, एक निवडणूक’ ही अचानक राबविण्याची प्रक्रिया नाही. हे सोपे काम नाही. अचानक ही बाब करता येणार नाही. सर्व विधानसभेत यासंदर्भातील विधेयक मंजूर करावे लागेल. भाजपशासित राज्यात होऊ शकेल, मात्र अन्य राज्यांत ही प्रक्रिया पार पाडणे सोपे नाही, असे मत मध्य प्रदेशचे काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केले.