Nitish Kumar vs BJP: "आमचं सरकार लवकर पाडा, कदाचित त्यानंतर तुम्हाला पक्षात मान मिळेल"; नितीश कुमारांनी सुशील मोदींची उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 07:55 PM2022-08-28T19:55:55+5:302022-08-28T19:57:14+5:30
सुशील मोदींनी केलेल्या टीकेला नितीश कुमारांचे जोरदार प्रत्युत्तर
Nitish Kumar vs BJP: बिहारमध्येनितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडून तेजस्वी यादव यांच्या साथीने नवीन सरकार बनवले. तेव्हापासून नव्या सरकारवर भाजपचा हल्लाबोल सुरूच आहे. पण आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपच्या शाब्दिक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. सुशील मोदींना महाआघाडीचे सरकार लवकरात लवकर पाडण्यास सांगा, असा उपरोधिक टोलाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले. सुशील मोदींची खिल्ली उडवत नितीश कुमार म्हणाले की, सुशील मोदींनी आता रोजच बोलत राहावे म्हणजे किमान त्यानंतर तरी केंद्रातील नेते त्यांच्यावर खूश होतील आणि त्यांना भाजपामध्ये काही तरी स्थान मिळेल.
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सुशील मोदी म्हणाले होते की, बिहारचे महागठबंधन सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही आणि लवकरच पडेल. कारण नितीश कुमार यांना IRCTC घोटाळ्याची लवकरात लवकर चौकशी करायची आहे. जेणेकरुन तेजस्वी यादव तुरुंगात जातील आणि राजद पक्ष फोडता येईल.
यावर प्रत्युत्तर देताना नितीश कुमार म्हणाले की, महाआघाडीचे सरकार पाडण्यासाठी सुशील मोदींशी बोला. सुशील मोदी आमचे सरकार पडेल असे म्हणत असतील तर त्यांना भाजपमध्ये जागा आणि मान मिळावा म्हणून त्यांना हे सरकार लवकर पाडण्यास सांगा. २०२० मध्ये बिहारमध्ये सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांच्याकडून काहीही काम झाले नाही. त्याचा मला खूप त्रास झाला. सुशील मोदींनी आता रोजच बोलत राहायला पाहिजे कारण या निमित्ताने केंद्रातील नेतेमंडळी त्यांच्यावर खूश झाली तर मला खूप आनंद होईल आणि त्यांना पक्षात कदाचित काही तरी पद मिळेल.