निवडणूक वर्षात नितीश कुमारांना धक्का; मुख्यमंत्र्यांच्या इफ्तार पार्टीवर मुस्लिम संघटनांचा बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 12:01 IST2025-03-23T12:00:56+5:302025-03-23T12:01:18+5:30
जेडीयूने वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे मुस्लिम संघटना नाराज आहेत.

निवडणूक वर्षात नितीश कुमारांना धक्का; मुख्यमंत्र्यांच्या इफ्तार पार्टीवर मुस्लिम संघटनांचा बहिष्कार
Bihar Election : बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. बिहार काबी करण्यासाठी सर्वच पक्षांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. बिहारमध्ये जात आणि धर्म फॅक्टर खूप महत्वाचा आहे. अशातच, मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मुस्लीम समाजाकडून मोठा धक्का बसला आहे. नितीश कुमारांच्या इफ्तार पार्टीवर मुस्लिम धार्मिक संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. जेडीयूने वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे मुस्लिम संघटना संतप्त झाल्या असून, त्यांनी पहिल्यांदाच नितीश यांच्या इफ्तार पार्टीपासून दूर राहिल्याचे बोलले जात आहे. रविवारी पाटण्यात ही इफ्तार पार्टी होणार आहे.
बिहारमध्ये जेडीयूच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आहे. भाजप, लोजपा (आर) आणि हिंदुस्थान अवाम मोर्चा देखील या सरकारचा भाग आहेत. केंद्रातील मोदी सरकार वक्फ (दुरुस्ती) विधेयक, 2024 आणण्याच्या तयारीत आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये मोदी मंत्रिमंडळाने संसदेच्या संयुक्त समितीने (JPC) प्रस्तावित केलेल्या 14 सुधारणांना मंजुरी दिली आहे. या दुरुस्त्या वक्फ मालमत्तेची नोंदणी, विवाद निपटारा प्रक्रिया आणि वक्फ बोर्डांच्या संरचनेशी संबंधित आहेत. विधेयकातील काही तरतुदींवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही या विधेयकाला विरोध केला आहे.
मुस्लिम संघटनांनी काय निर्णय घेतला?
जमियत उलेमा-ए-हिंद आणि इबादान-ए-शरिया या प्रमुख मुस्लिम संघटनांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयकावर एनडीएचे मित्रपक्ष नितीश कुमार, एन चंद्राबाबू नायडू आणि चिराग पासवान यांची भूमिका लक्षात घेऊन मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी इफ्तार, ईद मिलन आणि इतर कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. इबादान शरिया, जमात इस्लामी, जमात अहले हदीस, खानकाह मोजिबिया, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमियत उलेमा-ए-हिंद आणि खानकाह रहमानी या इफ्तार पार्टीवर बहिष्कार टाकणाऱ्या संघटना आहेत. इतर मुस्लिम संघटनांपासून अंतर राखण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
आरजेडीची टीका
आरजेडीने नितीश कुमार यांच्या इफ्तार पार्टीवरील बहिष्काराचे स्वागत केले आहे. इफ्तार पार्टीवर बहिष्कार टाकल्याबद्दल आरजेडीचे प्रवक्ते एजाज अहमद म्हणाले की, मुस्लिम धार्मिक संघटनांचा निर्णय योग्य आहे. जेडीयू मुस्लिमांसोबत दुटप्पीपणाने वागत आहे. एकीकडे वक्फ विधेयकाला पाठिंबा आणि दुसरीकडे इफ्तारची मेजवानी...दोन्ही चालणार नाही. जेडीयू, टीडीपी आणि एलजेपी (आर) हे सर्व भाजपच्या अजेंड्यासोबत उभे आहेत.
जेडीयूने उत्तर
जेडीयूचे प्रवक्ते नवल शर्मा म्हणाले, नितीश कुमार यांची धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करण्याची वचनबद्धता सर्वश्रुत आहे. बिहारमधील अल्पसंख्याकांचा सन्मान आणि उपजीविकेसाठी नितीशकुमार यांनी जी गंभीर काळजी दाखवली आहे, त्याचे उदाहरण गेल्या 20 वर्षांत नाही. नितीश कुमार गेली अनेक वर्षे इफ्तार पार्ट्या करत आहेत. ही काही नवीन गोष्ट नाही. पण ज्या राजदने आपल्या काळात बिहारमधील स्मशानभूमींवर कब्जा केला, मदरसा शिक्षकांना उपाशी ठेवले आणि भागलपूर दंगलीतील आरोपींना वाचवले, ते कोणत्या तोंडाने बोलत आहेत? असा टोला त्यांनी लगावला.