नितीशकुमारांची निवडक मंत्र्यांसह शपथ?
By admin | Published: November 17, 2015 02:47 AM2015-11-17T02:47:44+5:302015-11-17T02:47:44+5:30
महाआघाडीतील घटक पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसला त्यांच्या कोट्यातील मंत्र्यांची यादी देण्यास विलंब झाल्यास बिहारचे काळजीवाहू मुख्यमंत्री नितीशकुमार २० नोव्हेंबरला
पाटणा : महाआघाडीतील घटक पक्ष राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसला त्यांच्या कोट्यातील मंत्र्यांची यादी देण्यास विलंब
झाल्यास बिहारचे काळजीवाहू मुख्यमंत्री नितीशकुमार २० नोव्हेंबरला काही निवडक मंत्र्यांसहच शपथ घेतील.
संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) सूत्रांनी सांगितले की, नितीशकुमार यांना पक्षाने पूर्ण स्वातंत्र्य दिले असून त्यांच्या निर्णयात कुणीही हस्तक्षेप करणार नाही. केवळ सल्ला देऊ शकतील. ते महाआघाडीच्या विजयाचे खरे शिल्पकार आहेत, तसेच जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. त्यामुळे आमच्या पक्षात कसलीही समस्या नसून जदयूच्या कोट्यातील मंत्र्यांची यादी वेळेत तयार होईल, असा विश्वासही नितीशकुमार यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्या पक्षाच्या एका आमदाराने व्यक्त केला.
राजद आणि काँग्रेसच्या कोट्यातील मंत्र्यांची यादी मात्र वेळेच्या आत मिळण्याबाबत थोडी अनिश्चितता आहे.
लालूप्रसाद मागणार गृह आणि अर्थ
संवैधानिक तरतुदीनुसार मुख्यमंत्र्यांशिवाय मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ३५ मंत्री राहू शकतात. विधानसभेतील महाआघाडीच्या घटक पक्षांचे संख्याबळ आणि प्रत्येक पाच आमदारामागे एक मंत्री या फॉर्म्युल्याचा अवलंब केल्यास राजद, जदयू व काँग्रेसच्या वाट्याला अनुक्रमे १६, १५ आणि ५ मंत्री येतात.