बिहारमध्ये पुन्हा NDA'चे सरकार! नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, नवव्यांदा CM बनले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 05:17 PM2024-01-28T17:17:02+5:302024-01-28T17:19:52+5:30

बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार सत्तेत आले आहे.

Nitish Kumar takes oath as Bihar CM for the 9th time after he along with his party joined the BJP-led NDA bloc | बिहारमध्ये पुन्हा NDA'चे सरकार! नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, नवव्यांदा CM बनले

बिहारमध्ये पुन्हा NDA'चे सरकार! नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, नवव्यांदा CM बनले

बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार सत्तेतून बाहेर पडले आहे. सकाळीच नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश करत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. यावेळी भाजप समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या.

'नितीश कुमारांना विरोध होता अन् भविष्यातही राहील...', PM मोदींचे 'हनुमान' स्पष्टच बोलले

दरम्यान, आज सकाळपासूनच बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. सकाळीच नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिला होता. नितीश कुमार यांच्यासोबत जेडीयू आणि भाजपचे प्रत्येकी तीन मंत्री, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चातील एक आणि एका अपक्ष आमदाराने मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि चिराग पासवानही राजभवनात उपस्थित होते.

९ मंत्र्यांनी घेतली शपथ 

राज्यपालांनी नितीश कुमार यांच्यासह ९ जणांना मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार यांच्याशिवाय भाजपच्या कोट्यातून उपमुख्यमंत्रीपद मिळालेल्या दोन चेहऱ्यांमध्ये सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांचा समावेश आहे. नितीश कुमार यांच्यानंतर सम्राट चौधरी यांनी शपथ घेतली. याशिवाय विजय चौधरी, श्रवण कुमार, डॉ.प्रेम कुमार, संतोष कुमार सुमन, विजेंद्र यादव, सुमित सिंह यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, एलजेपी राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान, पशुपती पारस, उपेंद्र कुशवाह, जीतन राम मांझी यांच्यासह एनडीए घटक पक्षांचे सर्व नेते उपस्थित होते.

२४ वर्षांच्या या राजकीय प्रवासात नितीश कुमार यांनी आठ वेळा बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. आज नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री बनण्याची नववी वेळ होती. बिहारचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी नितीश कुमार हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मंत्रीही होते.

राजीनामा दिल्यावर नितीश कुमारांनी सांगितली 'मन की बात'

बिहारमध्ये तीन दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला, त्यानंतर सरकार पडले. आता नितीश कुमार आज संध्याकाळी पुन्हा एकदा एनडीएच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे.

रविवारी सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी लालू यादव यांच्या पक्षावर जोरदार निशाणा साधला होता. राजभवनातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले, माझ्या पक्षाचं मत लक्षात घेतल्यानंतर मी राजीनामा दिला. सरकारच्या सर्व कामांचे श्रेय ते (आरजेडी) घेत आहे, मी काम करत होतो पण मला काम करू दिलं जात नव्हतं, दोन्ही बाजूंनी त्रास होता.

राजभवनातून बाहेर आल्यानंतर नितीश कुमार म्हणाले, तुम्हा सर्वांना सांगत आहे की आज आम्ही राजीनामा दिला आहे. सर्व काही नीट होत नसल्याने राजीनामा देण्याची वेळ आली. आम्ही काहीही बोलणं बंद केलं होतं, सर्वांची मत येत होती, पक्षाच्या मताचा सर्व बाजूंनी विचार झाला, त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला.

Web Title: Nitish Kumar takes oath as Bihar CM for the 9th time after he along with his party joined the BJP-led NDA bloc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.