नितीश कुमार होणार जेडीयूचे अध्यक्ष, ललन सिंहांचा राजीनामा; बिहारमध्ये भूकंपाचे संकेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 01:38 PM2023-12-29T13:38:35+5:302023-12-29T13:40:31+5:30
ललन सिंह हे जेडीयूच्या अध्यक्षपदावरून दूर होतील, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती.
Nitish Kumar JDU ( Marathi News ) : जनता दल यूनायटेड (जेडीयू) या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक नवी दिल्ली येथे पार पडत असून या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नितीश कुमार हे जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. ललन सिंह हे जेडीयूच्या अध्यक्षपदावरून दूर होतील, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. या चर्चेवर आज अखेर शिक्कामोर्तब झालं असून सिंह यांनी राजीनामा दिला आहे. याबाबत जेडीयू नेते आणि बिहारचे कॅबिनेट मंत्री विजयकुमार चौधरी यांनी माध्यमांसमोर माहिती दिली आहे.
"मी लोकसभा निवडणूक लढवणार असून या निवडणुकीत मी व्यग्र राहणार असल्याने अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं ललन सिंह यांनी पक्षाच्या बैठकीत सांगितलं. त्यामुळे नितीश कुमार यांनी अध्यक्ष व्हावं असा प्रस्ताव आम्ही ठेवला असून हा प्रस्ताव स्वीकारल्यास नितीश कुमार हे जेडीयूचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होतील," अशी माहिती विजयकुमार चौधरी यांनी दिली आहे.
#WATCH | Delhi: Bihar Minister Vijay Kumar Choudhary says "There will national executive meeting of JD(U). If they accept our proposal then Nitish Kumar will be the party president. Lalan Singh told CM Nitish Kumar that he will be busy with elections, so he wants to hand over the… pic.twitter.com/qz4cqh7p8e
— ANI (@ANI) December 29, 2023
बिहारमध्ये मोठी उलधापालथ होणार?
काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळली नसल्याचं सांगत नितीश कुमार यांनी भाजपविरोधात दंड थोपटले आणि विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र इंडिया आघाडीच्या स्थापनेपासून त्यांना अपेक्षित असलेल्या गोष्टी घडत नसल्याने त्यांनी नाराजीचा सूर आळवायला सुरुवात केल्याची चर्चा रंगत आहे. ललन सिंह यांच्या पुढाकाराने मागील वर्षी नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि आरजेडीसोबत महाआघाडी केली होती. भाजपासोबतची युती तोडण्यात ललन सिंह यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. मात्र आता पक्ष पुन्हा भाजपासोबत जाण्याच्या तयारीत असल्यानेच ललन सिंह यांनी जेडीयूचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जेडीयूच्या कोअर कमिटीतील ९० टक्के लोक एनडीएच्या बाजूने?
'नवभारत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, जेडीयूच्या कोअर कमिटीतील ९० टक्के नेते भाजपासोबत पुन्हा आघाडी करण्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे नेत्यांचा दबाव आणि इंडिया आघाडीकडून झालेला भ्रमनिरास, या पार्श्वभूमीवर नितीश कुमार पुन्हा राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता नाकारता येत नाही.