Nitish Kumar : "मी काम करत होतो पण..."; राजीनामा दिल्यावर नितीश कुमारांनी सांगितली 'मन की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 12:21 PM2024-01-28T12:21:57+5:302024-01-28T12:33:20+5:30
Nitish Kumar : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी लालू यादव यांच्या पक्षावर जोरदार निशाणा साधला.
बिहारमध्ये तीन दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला, त्यानंतर सरकार पडले. आता नितीश कुमार आज संध्याकाळी पुन्हा एकदा एनडीएच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतात.
रविवारी सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी लालू यादव यांच्या पक्षावर जोरदार निशाणा साधला. राजभवनातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले, माझ्या पक्षाचं मत लक्षात घेतल्यानंतर मी राजीनामा दिला. सरकारच्या सर्व कामांचे श्रेय ते (आरजेडी) घेत आहे, मी काम करत होतो पण मला काम करू दिलं जात नव्हतं, दोन्ही बाजूंनी त्रास होता.
Nitish Kumar tendered his resignation as the Chief Minister of Bihar to Governor Rajendra Arlekar. The Governor accepted the resignation and deputed him as the Acting CM. pic.twitter.com/uaDXROe6PA
— ANI (@ANI) January 28, 2024
राजभवनातून बाहेर आल्यानंतर नितीश कुमार म्हणाले, तुम्हा सर्वांना सांगत आहे की आज आम्ही राजीनामा दिला आहे. सर्व काही नीट होत नसल्याने राजीनामा देण्याची वेळ आली. आम्ही काहीही बोलणं बंद केलं होतं, सर्वांची मत येत होती, पक्षाच्या मताचा सर्व बाजूंनी विचार झाला, त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला.
नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर आता एनडीएचे नेते त्यांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन राजभवनात जात आहेत जिथे ते आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र राज्यपालांना सुपूर्द करतील. त्यानंतर रविवारी संध्याकाळी नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. बिहारच्या राजकीय समीकरणाबद्दल बोलायचे झाल्यास, भाजपाकडे विधानसभेच्या 78 जागा आहेत, तर जेडीयूकडे 45 आमदार आहेत.