नितीशकुमारांचे ‘रक्षा’बंधन; आठव्यांदा झाले मुख्यमंत्री; तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रिपदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 06:48 AM2022-08-11T06:48:08+5:302022-08-11T06:48:14+5:30
शपथविधीनंतर नितीशकुमार यांनी भाजपवर कडक टीका केली.
पाटणा : नऊ वर्षांत भाजपशी दुसऱ्यांदा काडीमोड घेतलेल्या नितीशकुमार यांनी आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून बुधवारी शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचाही शपथविधी पार पडला. सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत स्वत:च्या भविष्याबद्दल चिंता करणे आवश्यक आहे, असा इशाराही नितीशकुमार यांनी दिला.
शपथविधीनंतर नितीशकुमार यांनी भाजपवर कडक टीका केली. त्यांनी सांगितले की, राजद व अन्य घटक पक्षांबरोबर आम्ही बिहारमध्ये स्थापन केलेले नवीन सरकार आपला कालावधी पूर्ण करणार नाही हा भाजपचा पोकळ दावा आहे. २०१४ साली केंद्रात सत्तेवर आलेले
भाजपचे सरकार २०२४ साली पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता कमी आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकांत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहनही नितीशकुमार यांनी केले.
तेजस्वी यांनी घेतले नितीशकुमारांचे आशीर्वाद
राजभवनामध्ये झालेल्या समारंभात नितीशकुमार यांना राज्यपाल फागू चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची व गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेजस्वी यादव यांनी शपथ घेतल्यानंतर नितीशकुमार यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले.
आधी बहुमत; नंतर मंत्रिमंडळ
नितीशकुमार यांनी सरकारचे बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. भाजपचे ७७ सदस्य असून, तो दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष आहे. भाजपचा एकही नेता नितीशकुमार यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिला नाही. सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण मिळाले नसल्याचा दावा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री व भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला होता. नितीशकुमार, तेजस्वी यादव यांच्या शपथविधी सोहळ्याला लालूप्रसाद यादव प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत; पण त्यांच्या पत्नी राबडीदेवी आवर्जून उपस्थित होत्या.