'नितीश कुमारांना विरोध होता अन् भविष्यातही राहील...', PM मोदींचे 'हनुमान' स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 05:01 PM2024-01-28T17:01:24+5:302024-01-28T17:02:03+5:30
बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमारांच्या नेतृत्वात NDA चे सरकार स्थापन होत आहे.
Bihar Politics: बिहारमध्ये (Bihar) पु्न्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी महाआघाडीशी फारकत घेत एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. या संपूर्ण घटनाक्रमावर स्वतःला पीएम मोदींचे हनुमान म्हणवणारे लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) प्रत्येक निर्णयासोबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पीएम मोदींसोबत कायम
नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना चिराग पासवान म्हणाले की, आगामी काळात सरकारची भूमिका काय आहे? सरकार कोणत्या अजेंड्यावर काम करेल? कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवला आहे का? या सर्व प्रश्नांवर पुढे चर्चा केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी आधी राजीनामा देणे आणि पुन्हा शपथ घेणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक निर्णयासोबत आहे.
मुख्यमंत्र्यांचा धोरणात्मक विरोध कायम राहील
ते पुढे म्हणाले की, बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार येत आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. मी एनडीएचा मित्रपक्ष म्हणून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट हे आमचे पंतप्रधान मोदीजींचे विचार आणि दृष्टी आहे. मुख्यमंत्र्यांना माझा धोरणात्मक विरोध होता आणि अजूनही आहे. त्यांच्या धोरणांमुळे बिहारच्या जनतेचा विकास झाला नाही, हे मी आधी बोललो होतो. मुख्यमंत्र्यांनी त्याच धोरणांवर काम केले, तर भविष्यातही हा विरोध कायम राहील.
नितीश कुमारांचा शपथविधी
नितीश कुमार 28 जानेवारी 2024 रोजी 9व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. विशेष म्हणजे, त्यांच्या पक्षाने 2020 मध्ये बिहार विधानसभा निवडणुका NDA सोबत लढून 43 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने 74 जागा जिंकल्या होत्या. यानंतर 2022 मध्ये त्यांनी भाजपशी संबंध तोडून आरजेडीसोबत सरकार स्थापन केले आणि आता पुन्हा एकदा एनडीएशी हातमिळवणी केली आहे.