शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत नितीश कुमार; 'या' दिवशी होणार विरोधी पक्षांची मोठी बैठक!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 10:55 PM2023-05-28T22:55:26+5:302023-05-29T22:31:28+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गेल्या एक महिन्यापासून विरोधी पक्षांच्या ऐक्याला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या अजेंड्यावर देशभरातील विरोधी पक्षांची बैठक घेत होते.
पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांची एकजूट मजबूत करण्याच्या तयारी वेग आला आहे. जवळपास वर्षभरापूर्वीपासून यासाठी प्रयत्न करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अखेर एका टप्प्यावर पोहोचले आहेत. जिथून त्यांना आपल्या विरोधी ऐक्याच्या मोहिमेचा अंदाज समजून येईल. त्यासाठीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 12 जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे.
12 जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षाची बैठक निश्चित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील, असे जेडीयू नेते मनजीत सिंह यांनी रविवारी सांगितले. दरम्यान, जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीत आले होते, तेव्हा केसी वेणुगोपाल यांनी लवकरच विरोधी पक्षांची बैठक बोलविण्यात येईल, असे म्हटले होते. परंतु तारीख आणि ठिकाण याबाबत स्पष्टपणे माहिती दिली नव्हती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेस प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पटना येथे 12 जून रोजी होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 12 जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर या बैठकीत 20 विरोधी पक्ष सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गेल्या एक महिन्यापासून विरोधी पक्षांच्या ऐक्याला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या अजेंड्यावर देशभरातील विरोधी पक्षांची बैठक घेत होते. मंगळवारीच ते पाटण्याला परतले होते. याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्री नितीश यांनी सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली आणि इतर विरोधी नेत्यांसोबत आतापर्यंत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली होती. यादरम्यान पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीतही चर्चा झाली.