नितीश कुमार घेणार नवव्यांदा शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 09:23 AM2024-01-28T09:23:24+5:302024-01-28T09:23:40+5:30
Nitish Kumar News: महागठबंधन सोडून रालोआसोबत जात असलेले नितीशकुमार हे रविवारी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ शक्यता आहे. याआधी त्यांनी अनेक वेळा आघाडी बदलली आहे.
- एस. पी. सिन्हा
पाटणा : महागठबंधन सोडून रालोआसोबत जात असलेले नितीशकुमार हे रविवारी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ शक्यता आहे. याआधी त्यांनी अनेक वेळा आघाडी बदलली आहे.
इ.स. २००० मध्ये नितीशकुमार भाजपला सोबत घेऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. मात्र बहुमताअभावी त्यांना ७ दिवसांतच राजीनामा द्यावा लागला होता. २००५ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा भाजपसोबतच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २०१० मध्ये नितीशकुमार मुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशील मोदी उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर ते १४ वर्षे भाजपसोबत राहिले. २०१४ मध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा घोषित केल्यामुळे नाराज झालेल्या नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडली. मात्र, त्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री केले.
२०१५ मध्ये ते महागठबंधनमध्ये गेले आणि मुख्यमंत्री झाले. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले. २०१७ मध्ये त्यांनी महागठबंधन सोडून भाजपसोबत घरोबा केला. २०२०ची निवडणूक भाजपसोबत लढून ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा महागठबंधनसोबत गेले. जदयुला वगळल्यास महागठबंधनकडे ११४ आमदार आहेत. बहुमताचा १२२ हा आकडा गाठण्यासाठी त्यांना फक्त ८ आमदार कमी पडतात. ‘हम’चे ४ आमदार आल्यास आणखी ४ आमदारांचीच गरज महागंठबनला भासेल. रालोआचे संख्याबळ १२७ आहे.
लालूंना सर्वाधिकार
राष्ट्रीय जनता दलाची (राजद) एक बैठक शनिवारी झाली. सर्व निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीतील निर्णयांची माहिती पक्ष प्रवक्ते मनोज झा यांनी नंतर पत्रकारांना दिली. या बैठकीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सांगितले की, मी नेहमीच आघाडी धर्माचे पालन केले आहे.
शपथविधीला अमित शाह येणार
प्राप्त माहितीनुसार, नितीशकुमार हे रविवारी सकाळी ११.०० वा. राजभवनावर नव्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या शपथविधीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. नव्या सरकारमध्ये २ उपमुख्यमंत्री असतील.
खरगे यांच्याशी बोलणे टाळले
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शनिवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन घेण्याचे टाळले. त्यांची मनधरणी करण्यासाठी खरगे यांनी फोन केला होता, असे समजते. मागील २४ तासांपासून लालूप्रसाद यादव हे नितीशकुमार यांना फोन करण्याचा प्रयत्न करीत होते.