नितीशकुमार यांच्या गटाला मान्यता, आयोगाचा निर्णय; यादव यांचा दावा फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:16 AM2017-11-18T00:16:06+5:302017-11-18T00:16:53+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून, धनुष्य हे निवडणूक चिन्हही त्यांच्याच पक्षाला मिळाले.
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त जनता दलाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून, धनुष्य हे निवडणूक चिन्हही त्यांच्याच पक्षाला मिळाले.
भाजपच्या मदतीने बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याच्या नितीशकुमार यांच्या निर्णयाला पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव आणि अन्य काही नेत्यांनी विरोध दर्शवला होता, तसेच आपलाच गट हा संयुक्त जनता दल असल्याचा दावा शरद यादव यांनी केला होता. फुटीनंतर शरद यादव यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावून, छोटूभाई वसावा यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. दुसरीकडे शरद यादव व अली अन्वर यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करावे, असे निवेदन नितीशकुमार गटातर्फे अध्यक्षांना देण्यात आले
होते.
यादव, अन्वर अडचणीत-
आता मात्र निवडणूक आयोगाने नितीशकुमार यांच्या पक्षाला मान्यता दिल्याने शरद यादव आणि अली अन्वर यांचे राज्यसभा सदस्यत्वही अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद यादव हे बराच काळ संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष होते आणि ते १९७५ पासून लोकसभा वा राज्यसभेचे सदस्य आहेत.