नितीशकुमार यांच्या जदयूने अखेर काडी टाकलीच; अग्निवीर, UCC वर विचार व्हायला हवा, मूळ मागणीही रेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 12:27 PM2024-06-06T12:27:34+5:302024-06-06T12:33:52+5:30
Lok sabha Politics: जदयूने अखेर आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. समान नागरी कायदा आणि अग्निवीरबाबत आपली आधीचीच भुमिका राहणार असल्याचे जदयूने स्पष्ट केले आहे.
ज्या नितीशकुमार यांच्या जदयूच्या खासदारांच्या जिवावर भाजपा सत्ता स्थापन करत आहे, त्या जदयूने अखेर आपले जदयूने अटी-शर्ती ठेवायला सुरुवात केली आहे. समान नागरी कायदा आणि अग्निवीरबाबत आपली आधीचीच भुमिका राहणार असल्याचे जदयूने स्पष्ट केले आहे. जदयूचे महासचिव आणि प्रवक्ता के सी त्यागी यांनी सांगितले की या मुद्द्यांवर सर्व राज्यांशी बोलण्याची आणि त्यांचे विचार समजून घेण्याची गरज असल्याचे तेव्हाही सांगितले होते.
जदयूने वन नेशन, वन इलेक्शनला आपले समर्थन दिले आहे. त्यागी म्हणाले आमचा एक देश एक निवडणूक याला पाठिंबा आहे. अग्निवीर योजनेला खूप विरोध झाला होता. निवडणुकीतही त्याचा परिणाम दिसला आहे. यावर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. यूसीसीवर नितीश कुमार यांनी विधी आयोगाच्या अध्यक्षांना पत्र लिहून आम्ही याच्या विरोधात नाही, मात्र यावर व्यापक चर्चा आवश्यक असल्याचे म्हटले होते, तीच आजही भुमिका राहणार असल्याचे त्यागी यांनी स्पष्ट केले.
अग्निवीर योजनेवर बोलताना त्यागी म्हणाले की, सुरक्षा कर्मचारी सैन्यदलात तैनात करण्यात येतात. ज्यावेळी अग्निवीर योजना आली तेव्हा मोठ्या वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांनीही निवडणुकीत याचा विरोध केला आहे. त्यामुळे यावर नव्या पद्धतीने चर्चा करण्याची गरज आहे, असे त्यागी म्हणाले.
याचबरोबर नितीशकुमार यांनी ज्या मागणीवरून एनडीएची साथ सोडली होती, तीच मागणी पुन्हा जदयूने रेटली आहे. आम्ही बऱ्याच काळापासून मागणी करत आहोत की बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्या, जर बिहारमधून लोकांचे स्थलांतर रोखायचे असेल तर हे करणे गरजेचे आहे. आम्ही एनडीएमध्ये एक ताकदवर भागीदार आहोत, असा सौम्य इशाराही त्यागी यांनी दिला आहे.