सोनियांना टाळून नितीश कुमार करणार पंतप्रधान मोदींसोबत "लंच पे चर्चा"
By admin | Published: May 27, 2017 12:41 PM2017-05-27T12:41:12+5:302017-05-27T12:41:12+5:30
विरोधी पक्षीय नेत्यांच्या बैठकीपासून दूर राहिलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - राष्ट्रपतीपद उमेदवार निवडीबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या 17 विरोधी पक्षीय नेत्यांच्या बैठकीपासून दूर राहिलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनामध्ये सहभागी होण्याच्या निर्णयामुळे नितीश कुमार यांच्या भाजपासोबतच्या जवळकीतेसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या एकजुटीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
राष्ट्रपतीपद निवडणूक तसंच 2019 लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यानिमित्त, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात महाआघाडी करण्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी तयारी सुरू केल्याचेही म्हटले जात आहे.
पण, या बैठकीला नितीश कुमार अनुपस्थित राहिले. त्यातच आज पंतप्रधान मोदींनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठी मात्र ते हजर राहणार आहेत. यावरुन राष्ट्रीय राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. सोनियांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहण्याबाबत स्पष्टीकरण देताना नितीश कुमार म्हणाले आहेत की, ""विरोधी पक्षांच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. जेडीयूचे नेते शरद यादव या बैठकीत पार्टीचे प्रतिनिधित्व करत होते. मी सोनियांची एप्रिल महिन्यात भेट घेतली होती आणि ज्या मुद्यांवर आता चर्चा होणार होती त्यावर आधीच मी चर्चा केली होती. यावेळी त्यांनी सर्व विरोधी पक्षांना भोजनासाठी आमंत्रित केले होते."" नितीश कुमार यांनी पूर्वनियोजीत कार्यक्रम असल्याचे कारण देत या बैठकीला दांडी मारली होती.
दरम्यान, शुक्रवारी (26 मे) काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी 17 पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, सीताराम येचुरी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, जेडीयूचे नेते शरद यादव, ओमार अब्दुल्ला, के.सी त्यागी तसंच समाजवादीचे नेते रामगोपाल यादव या बैठकीसाठी हजर होते.