नितीशकुमार यांचा कोविंद यांना पाठिंबा
By admin | Published: June 22, 2017 05:59 AM2017-06-22T05:59:33+5:302017-06-22T05:59:33+5:30
बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त) चे अध्यक्ष नितीशकुमार यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपा
हरिश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (संयुक्त) चे अध्यक्ष नितीशकुमार यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसला मोठाच धक्का बसला असून, विरोधकांच्या ऐक्यालाही यामुळे तडा गेला आहे. नितीशकुमार यांच्या निर्णयामुळे भाजपामध्ये आनंदाचे वातावरण असून, कोविंद यांना ७ लाखांहून अधिक मते मिळतील, असा दावा केला जात आहे.
प्रणव मुखर्जी निवडून आले, तेव्हा त्यांना १0 लाख ९८ हजारांपैकी ७ लाख १३ हजार मते मिळाली होती. त्या वेळी त्यांना शिवसेनेचाही पाठिंबा मिळाला होता. रामनाथ कोविंद यांना मुखर्जी यांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक समर्थन मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असून, आमच्याकडे आताच सुमारे ६ लाख ९२ हजार मते निश्चित आहेत आणि त्यात आणखी मोठी वाढ होईल, असे भाजप नेते सांगत आहेत. रालोआमध्ये २१ नव्हे, तर ३४ पक्ष आहेत आणि त्यांच्या मतांचे मूल्य ५ लाख ४0 हजार इतके आहे. अण्णा द्रमुकनेही बुधवारी रात्री कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांची आणि वायएसआर काँग्रेस, तेलंगण राष्ट्रीय समिती, बिजू जनता दल आणि जनता दल (संयुक्त) यांची मते गृहीत धरता मतांची संख्या ६ लाख ९९ हजार इतकी होईल. खेरीज काही अपक्ष आणि उत्तराखंडातील आमदार व खासदार यांची मते धरून ही संख्या ६ लाख ९९ हजार इतकी होईल, असा भाजपचा दावा आहे.
आता भाजपचे सारे लक्ष आहे बसपा (८२00 मते), तृणमूल काँग्रेस (६३ हजार ८४७ मते), राष्ट्रीय लोक दल (२0८), भारतीय लोक दल (४२५२) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (१५ हजार ८७५ मते) या विरोधी पक्षांकडे लागले आहे. यापैकी दोन्ही लोक दलाच्या नेत्यांनी कोविंद यांना मते देण्याचे संकेत दिले आहेत. मायावती यांनी कोविंद यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असली तरी काँग्रेस व अन्य विरोधक कोण उमेदवार देतात, यावर बसपाचा निर्णय अवलंबून असेल. तृणमूल अद्याप संभ्रमात आहे, तर शरद पवार यांनी कोविंद यांच्या उमेदवारीबाबत भूमिकाच घेतलेली नाही.
हे सारे पाहता, यापैकी काही पक्षांची मते कोविंद यांना मिळतील आणि त्यांच्या मतांचा आकडा ७ लाख १५ हजारच्या वर जाईल, असे भाजपचे समीकरण आहे.
लालू मात्र विरोधकांसोबत
‘जदयू’ने रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याचे ठरविले असले तरी राष्ट्रीय जनता दल मात्र विरोधी पक्षांसोबत जाईल व विरोधकांच्या गुरुवारच्या बैठकीत जो उमेदवार ठरेल त्यास पाठिंबा देईल, असे ‘राजद’चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पाटणा येथे सांगितले.
मी अनभिज्ञ : शिंदे
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपले नाव चर्चेत असल्याबद्दल मी ऐकतो आहे, पण याबाबत मला पक्षाकडून कोणतीही विचारणा अद्यापपर्यंत झाली नाही, असे स्पष्टीकरण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. गुरूवारी सायंकाळी दिल्लीत लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक बोलाविण्यात आली असली तरी मला बैठकीचे निमंत्रण नाही. सध्या मी सोलापूरकडे येत आहे.उद्याचे उद्या पाहू, असेही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांना डाव्या पक्षांची पसंती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांचे नाव डाव्या पक्षांकडून राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी सुचविले जाण्याची शक्यता असून, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बोलून त्यांची मते जाणून घेत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. राजकीय लढाई म्हणून विरोधी पक्षांनी कोविंद यांच्याविरुद्ध उमेदवार उभा करायला हवा, असा डाव्या पक्षांचा आग्रह आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या नावाचा विचार करीत आहोत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांची बैठक उद्या गुरुवारी बैठक व्हायची असून, त्यात आंबेडकर यांचे नाव सुचवले जाणार आहे.