नितीशकुमारांची तांत्रिकाला ‘झप्पी’; राजकारण तापले
By admin | Published: October 25, 2015 04:07 AM2015-10-25T04:07:07+5:302015-10-25T04:07:07+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला असतानाच महाआघाडीचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एका तांत्रिकाची भेट घेतल्याचा
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला असतानाच महाआघाडीचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एका तांत्रिकाची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठे वादळ निर्माण झाले आहे. हा तांत्रिक बिहारच्या सिवान येथील राहणारा असून त्याचे नाव झप्पी बाबा आहे.
या व्हिडिओने संयुक्त जनता दलाचे नेते असलेले नितीशकुमारांच्या विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यापासून मुक्ती मिळविण्याकरिता नितीशकुमारांना तंत्रमंत्राचा आधार घ्यावा लागला, अशी टीका विरोधकांनी केली आहे.
भाजपने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना नितीशकुमार आणि लालूप्रसाद या जोडगोळीवर थेट लक्ष्य साधले. लालूप्रसाद यांच्याकडून सुटका करून घेण्याकरिताच नितीशकुमार यांनी तांत्रिकाची भेट घेतली होती, असा आरोप या पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराजसिंग यांनी केला. विधानसभा निवडणुकीत आपला पराभव निश्चित असल्याचे लक्षात येताच संजद नेते तांत्रिकाला शरण गेले, असेही टीकास्त्र त्यांनी सोडले.
दुसरीकडे संजदच्या नेत्यांनी मात्र हा व्हिडिओ फार जुना असल्याचा दावा केला आहे. साधुसंतांना भेटण्यात गैर काय? असाही सवाल त्यांनी केला. भाजपाचे नेते विनाकारण हा मुद्दा निवडणुकीत उचलून धरण्याचा प्रयत्न करीत असल्याचा त्यांचा आरोप होता.
दरम्यान राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांना पत्रकारांनी या व्हिडिओसंदर्भात विचारले असता त्यांनी गमतीने घेत उत्तर देण्याचे टाळले व आपल्या शैलीत कुठल्याही तांत्रिकापेक्षा आपण सर्वात मोठे तांत्रिक आहोत, असे सांगितले. (वृत्तसंस्था)
तांत्रिकाने विचारले लालूंशी हातमिळवणी का केली?
या व्हिडिओतील आवाज अस्पष्ट असला तरी यात नितीशकुमार एका तांत्रिकासोबत खाटेवर बसलेले स्पष्ट दिसतात. त्यांच्यासमवेत संजदचे उमेदवार नीरजकुमार हे सुद्धा आहेत.
नितीशकुमार आणि तांत्रिकातील बरेचसे संभाषण बरोबर ऐकू येत नसले तरी काही वेळेला तांत्रिक त्यांना आपण लालूप्रसाद यांच्यासोबत हातमिळवणी का केली? अशी विचारणा करीत असल्याचे स्पष्ट ऐकायला येते. एवढेच नाहीतर या तांत्रिकाने ‘नितीश जिंदाबाद, लालू मुर्दाबाद’ अशा घोषणाही दिल्या.
नितीशकुमारांनी या तांत्रिकाचे आशीर्वाद आणि गळाभेटही घेतली, असे यात दिसून येते.