मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमारांच्या जदयूच्या सहभागाविषयी अनिश्चितता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 04:22 PM2017-09-02T16:22:27+5:302017-09-02T16:29:12+5:30
उद्या होणा-या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात अण्णाद्रमुक आणि जनता दल युनायटेड यांच्या सहभागाविषयी अनिश्चितता कायम आहे.
नवी दिल्ली, दि. 2 - उद्या होणा-या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात अण्णाद्रमुक आणि जनता दल युनायटेड यांच्या सहभागाविषयी अनिश्चितता कायम आहे. रविवारी पंतप्रधान मोदींच्या बहुचर्चित मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तामिळनाडूमधल्या सत्ताधारी अण्णाद्रमुकमध्ये अजूनही अंतर्गत मतभेद कायम आहेत तसेच टीटीव्ही दिनाकरनने काही आमदारांच्या मदतीने राज्य सरकारच्या स्थिरतेलाच आव्हान दिले आहे. त्यामुळे अण्णाद्रमुक सहभागी होण्याची शक्यता धुसर आहे.
आम्हाला सरकारमध्ये सहभागी होण्याविषयी अद्यापही काहीही माहिती मिळालेली नाही असे जनता दल युनायटेडच्या सूत्रांनी सांगितले. आमचे खासदार दिल्लीत आहेत. पण उद्या होणा-या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आमच्याशी अद्याप संपर्क करण्यात आलेला नाही असे जदयूच्या नेत्याने सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल रविवारी सकाळी १० वाजता होणार असून, त्याची सगळी तयारी झाली आहे. आठ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. आणखी दोघे राजीनामा देण्याची शक्यता आहे. कलराज मिश्रा, उमा भारती, बंडारू दत्तात्रय, राजीवप्रताप रुडी, फग्गनसिंह कुलस्ते, संजीव बलियां आणि महेंद्रनाथ पांडे यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा सादर केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बांधले गेले आहेत. कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचेही नाव घेतले जात असले तरी पद सोडायला सांगितल्याचा त्यांनी इन्कार केला.
मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांचेही पद धोक्यात आहे. कुशवाह हे कुर्मी समाजाचे असून, बिहारमधील कुर्मी समाजाच्या राजकारणासाठी नितीशकुमार यांना ते मंत्रिमंडळात नको आहेत. मोदी यांनी शुक्रवारी सायंकाळी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांशी राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा केली. या बैठकीस अरुण जेटली, नितीन गडकरी, राजनाथसिंह उपस्थित होते. जेटली यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी असलेले संरक्षण मंत्रिपद कोणाला दिले जाणार हे अजून स्पष्ट नाही.
आमचे लक्ष मुंबईच्या आरोग्याकडे
उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे आम्हाला प्रसारमाध्यमांकडून कळले. आम्हाला कोणाचाही फोन आला नाही. आम्ही सत्तेसाठी लालची नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत शिवसेनेच्या एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. सर्वांच लक्ष मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागले आहे. पण आमचे लक्ष मात्र मुंबईकरांच्या आरोग्याकडे आहे असे ते म्हणाले.
गडकरींकडे ‘रेल्वे’ जवळपास निश्चित..
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी फार दिवस राहणार नसल्याचे केलेले विधान व भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीसाठी मंत्र्यांची झालेली गर्दी यामुळे मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू झाली. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वे खाते येऊ शकते. तर, सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात कायम ठेवून गंगा शुद्धीकरण आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. संरक्षण खात्याची जबाबदारी कोणाकडे येईल हे स्पष्ट नाही.