बिहारमध्ये पुन्हा नितीशराज येणार
By Admin | Published: February 8, 2015 01:25 AM2015-02-08T01:25:34+5:302015-02-08T01:25:34+5:30
सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या केंद्रीय नेतृत्वासोबत केलेली बंडाळी बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना चांगलीच भोवली.
समेटाचे प्रयत्न निष्फळ : माजी मुख्यमंत्र्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड
पाटणा : सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या केंद्रीय नेतृत्वासोबत केलेली बंडाळी बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना चांगलीच भोवली. मांझी यांनी शनिवारी तातडीची बैठक बोलावून मांडलेला विधानसभा विसर्जनाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने धुडकावून लावला. दरम्यान, माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली असून, ते पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ होण्याचा त्यांचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
विधानसभा विसर्जनाच्या प्रस्तावाला मांझी यांच्याशिवाय फक्त सात मंत्र्यांनी पाठिंबा दिला. तर नितीशकुमारांच्या गोटातील मानल्या जाणारे २१ मंत्री प्रस्तावाच्या विरोधात गेले. राज्याचे अर्थमंत्री विजेंद्र यादव यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या या बैठकीला सर्व २९ मंत्री हजर होते. कृषी मंत्री नरेंद्र सिंग यांनी हा प्रस्ताव मांडला. राजीव रंजनसिंग लल्लन आणि पी.के. शाही हे दोघे यावेळी उपस्थित नव्हते. कारण मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवरून राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी या दोघांनाही दुपारी मंत्रिपदावरून बडतर्फ केले होते.
प्रस्तावाच्या बाजूने राहिलेले मंत्री
नितीशकुमार यांचे अत्यंत विश्वासू अन्नमंत्री श्याम रजाक यांनी सांगितले की, मांझी यांच्या बाजूने आणि प्रस्तावाला पाठिंबा देणाऱ्या मंत्र्यांमध्ये नरेंद्र सिंग, ब्रिशेन पटेल, बिनय बिहारी, शाहीद अली खान, नितीश मिश्रा, भीम सिंग आणि महाचंद्र प्रसाद सिंग यांचा समावेश आहे. मांझी यांनी जवळपास दोन तास नितीशकुमार यांच्याशी चर्चा केल्यानंतर लगेच ही बैठक झाली.
मांझींनी घेतली नितीशकुमार यांची भेट
च्सत्तासंघर्षावरून वेगाने बदलत्या घडामोडीत पक्षश्रेष्ठींचे राजीनामा देण्याचे निर्देश धुडकावणारे मुख्यमंत्री जितनराम मांझी हे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेण्यास सकाळी ११ वाजता थेट त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी ज्येष्ठमंत्रिद्वय नरेंद्र सिंग आणि ब्रिशेन पटेल कारमध्ये त्यांच्यासमवेत होते.
च्मांझींच्या पाच मिनिटे आधीच संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव ७, सर्क्युलर रोडस्थित नितीशकुमार यांच्या घरी पोहोचले होते. तत्पूर्वी, माजी कृषी मंत्री नरेंद्र सिंग या संघर्षावर पाण्याचा शिडकावा करण्याच्या उद्देशाने सकाळी ११ वाजताच नितीश यांच्या घरी धडकले होते.