नितीशकुमार पुन्हा सक्रिय, ऐक्याच्या पंखांना बळ; काँग्रेसच्या होकारानंतर पाटण्यात बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 12:41 PM2023-05-06T12:41:16+5:302023-05-06T12:41:37+5:30
माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे की, संपूर्ण भारतात असा कोणताही एक फॉर्म्युला चालू शकत नसल्याने राज्यनिहाय आघाडीचा विचार करावा.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ओडिशात जाऊन आपले समकक्ष नवीन पटनायक यांना भेटत असल्याने विरोधकांच्या ऐक्याच्या पंखांना बळ मिळाले आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी नितीशकुमार प्रयत्नशील आहेत. नितीशकुमार यांनी यापूर्वीच विरोधी पक्षांच्या सहापेक्षा अधिक नेत्यांची भेट घेतलेली आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल, कोलकाता येथे ममता बॅनर्जी आणि लखनौमध्ये अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचीही भेट घेऊन स्वीकारार्ह फॉर्म्युला तयार केलेला आहे.
काँग्रेसने समविचारी पक्षांना बरोबर घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवल्यानंतर आणि नितीशकुमार यांना अशी शक्यता पडताळून पाहण्यासाठी अधिकृत केल्यानंतर ते सक्रिय झाले आहेत. असे असले तरी पाटणा येथे बैठक घेण्याच्या नितीशकुमार यांच्या सूचनेला काँग्रेस हायकमांडने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. ममता बॅनर्जी यांनी अशा बैठका राज्यांमध्येही घेता येतील, असे सुचविलेले आहे. मात्र, कर्नाटकच्या निवडणुकीनंतरच यावर विचार करू, असे काँग्रेसने स्पष्ट केलेले आहे. बिहार काँग्रेस प्रमुख आणि राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी सांगितले की, विरोधकांची बैठक पाटण्यात घेण्याबाबतचा निर्णय १५ मेनंतरच घेतला जाईल.
माकपाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे की, संपूर्ण भारतात असा कोणताही एक फॉर्म्युला चालू शकत नसल्याने राज्यनिहाय आघाडीचा विचार करावा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस व इतरांशी हातमिळवणी करण्याची व ‘आप’ने निवडक जागा लढविण्याची तयारी दर्शवली आहे. २०१४मध्ये ‘आप’ने ४०० पेक्षा जास्त जागा लढवल्या होत्या. तसेच २०१९मध्ये १०० पेक्षा कमी जागा लढवल्या होत्या.
नितीशकुमार यांनी भाजपशी संबंध तोडल्यानंतर काँग्रेस, जदयू महागठबंधनमध्ये आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात विरोधकांचा एकच उमेदवार देण्याच्या फॉर्म्युल्यावर नितीशकुमार विरोधी पक्षांशी चर्चा करीत आहेत.