बिहारमध्ये पुन्हा नितीशराज
By Admin | Published: February 21, 2015 04:12 AM2015-02-21T04:12:39+5:302015-02-21T04:12:39+5:30
शेवटपर्यंत जमिनीला पाठ लागू देणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या जितनराम मांझी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
पाटणा : कसलेल्या पैलवानाप्रमाणे मीही शेवटपर्यंत जमिनीला पाठ लागू देणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या जितनराम मांझी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही तासांतच राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी नितीशकुमार यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिल्याने बिहारमध्ये गेले काही दिवस रंगलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला.
लोकसभा निवडणुकीतील जदयूच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून सत्ता सोडल्याने पश्चात्ताप झालेले नितीशकुमार रविवारी २२ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. राज्यपालांनी नितीशकुमार यांना तीन आठवड्यांत म्हणजे १६ मार्चपूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. नव्याने अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलवण्यासह राज्यपालांच्या अभिभाषणाची तारीख निश्चित करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
समर्थक आमदारांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यामुळेच मी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे, कारण मला त्यांची आमदारकी गमवायची नाही, असे सांगत मांझी यांनी पायउतार होण्याचे समर्थन केले.
विधानसभाध्यक्ष उदयनारायण चौधरी हे कुणाच्या तरी इशाऱ्यावर चालत असून ते कधीही गुप्त मतदान होऊ देणार नव्हते. त्यामुळेच मी समर्थक आमदारांना धोक्यात न टाकता राजीनामा देणे पसंत केले, असे मांझी यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांना सांगितले. राजभवनात जाऊन राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सभागृहात न जाता घरीच पत्रपरिषद बोलावत भूमिका स्पष्ट केली.
भाजपाने घाबरविले
भाजपाने घाबरविल्याने मांझी यांनी राजीनामा दिल्याचा आरोप काँग्रेसने केला. नितीशकुमार यांनी महादलित नेत्याचा ‘बळी’ दिल्याची टिका रालोआने केली. कटकर्त्यांना चूक कळली आहे. अशा पद्धतीने मांझींना समर्थन दिले तर लोक आपल्याला शिक्षा देतील ही जाणीव झालेल्या भाजपने मांझींना घाबरविले व या जाळ्यात ते अलगद अडकले असा दावा काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी केला.
नितीशकुमार यांनी यापूर्वी महादलितांना जवळ करीत दलितांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण खेळले आहे. त्यांनी सर्वात आधी पासवानांना धक्का दिला. आता त्यांनी सत्तेसाठी महादलित जितनराम मांझी यांना सुळावर चढविले आहे. - रामविलास पासवान, केंद्रीय मंत्री
मांझी हे महादलित आहेत. त्यांना हादरा बसू नये म्हणून भाजपा त्यांच्या पाठीशी उभा आहे. -शाहनवाज हुसेन, भाजपा नेते.
नितीशकुमार म्हणाले...
मी जनतेची माफी मागतो
गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वत:हून राजीनामा दिल्याबद्दल नितीशकुमार यांनी बिहारच्या जनतेची माफी मागितली आहे.
मला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाल्यास मी साडेआठ वर्षे ज्याप्रमाणे चांगले सरकार दिले त्याच निष्ठेने सेवा करेन, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मी भावनेच्या भरात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्याबद्दल माफी मागतो. आता पुन्हा नेतृत्व करण्याची माझी तयारी आहे, असेही ते म्हणाले.