CoronaVirus News: कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला, लागण झाल्यास गंभीर आजारांचा धोका, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 08:00 AM2021-06-08T08:00:55+5:302021-06-08T08:01:58+5:30
CoronaVirus News: ब्रिटन आणि ब्राझीलहून आलेल्या प्रवाशांमध्ये सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांच्या आकडा लाखाच्या घरात आला असल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यात देशात कोरोनाची दुसरी लाट आली. ती लाट ओसरत असताना आता कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट चिंतेत भर घालत आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीला (एनआयव्ही) कोरोना विषाणूचा B.1.1.28.2 व्हेरिएंट सापडला आहे. ब्रिटन आणि ब्राझीलहून आलेल्या लोकांमध्ये हा व्हेरिएंट आढळून आला आहे.
नव्या व्हेरिएंटमुळे कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये गंभीर लक्षणं दिसून येऊ शकतात. या व्हेरिएंटमुळे बाधित व्यक्ती गंभीर आजारी पडू शकते. या व्हेरिएंटविरोधात लस प्रभावी ठरू शकते की नाही यासाठी स्क्रिनिंग करण्याची गरज आहे. एनआयव्हीनं केलेला अभ्यास bioRxiv मध्ये प्रसिद्ध झाला आहे. मात्र पुणे एनआयव्हीनं केलेल्या आणखी एका अभ्यासानुसार B.1.1.28.2 व्हेरिएंटविरोधात कोवॅक्सिन प्रभावी आहे. कोवॅक्सिनचे दोन डोस घेतल्यावर शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. या अँटिबॉडीज या व्हेरिएंटला निष्प्रभ करण्यास सक्षम आहेत.
B.1.1.28.2 व्हेरिएंटचे अतिशय प्रतिकूल परिणाम सीरियन उंदरांवर दिसून आले. यामध्ये वजन घटणं, श्वसन नलिकेत विषाणूची कॉपी तयार होणं, फुफ्फुसाचं अतिशय जास्त नुकसान या बाबी दिसून आल्या. एनआयव्हीच्या संशोधनानं SARS-CoV-2 च्या जीनोम सर्विलान्सची गरज व्यक्त केली आहे. रोगप्रतिकारशक्तीला चकवा देणाऱ्या व्हेरिएंट्सचा सामना करण्यासाठी जीनोम सर्विलान्स आवश्यक आहे. आजारासाठी जबाबदार असलेल्या म्युटंट्सचा शोध घेण्याचं काम जीनोम सिक्वन्सिंगच्या माध्यमातून केलं जातं.