चोख बंदोबस्तात ‘नीट’-१ सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2016 02:29 AM2016-05-02T02:29:56+5:302016-05-02T02:29:56+5:30
सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामाईक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याचा आदेश दिल्यानंतर संभ्रमावस्था निर्माण झाली असतानाच १ मे रोजी पहिल्या टप्प्याची
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर एकच सामाईक प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याचा आदेश दिल्यानंतर संभ्रमावस्था निर्माण झाली असतानाच १ मे रोजी पहिल्या टप्प्याची परीक्षा पार पडली. सीबीएसईने परीक्षार्थींना घालून दिलेली वेशसंहिता आणि अन्य निर्बंधानुसार ही परीक्षा घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
४२ शहरांतील १,०४० केंद्रांवर ६.६७ लाख परीक्षार्थींनी ही परिक्षा दिली. गेल्या वर्षी हिच परीक्षा प्री मेडिकल एन्ट्रन्स टेस्ट म्हणून घेण्यात आली होती. त्यात मोठ्या प्रमाणावर गोंधळ व गैरप्रकार झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने ती रद्द केली होती. या पार्श्वभूमीवर आजच्या परीक्षेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षार्थींना टोपी, अंगठी, ब्रेसलेट, मनगटी घड्याळ, पादत्राणे यासह परीक्षाकेंद्रात जाण्यास मनाई होती. पेन-पेन्सिलही आत नेऊ दिली गेली नाही. ज्यांनी अर्ज केला नाही अशा विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजी दुसऱ्या टप्प्यात ही परीक्षा देता येईल. दरम्यान सीबीएसईने १ मे रोजी विद्यार्थ्यांनी दिलेला पेपर आॅनलाईन केला आहे. विद्यार्थ्यांना स्वत:चा कोड टाकून अॅन्सर की आणि सोडविलेली प्रश्नपत्रिका डाऊनलोड
करता येईल. या परीक्षेचे कटआॅफ गुण सीबीएसई एआयपीएमटी साईटच्या मुख्य पोर्टलवर घोषित केले जातील, असे सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राज्य सरकार
आज सुप्रीम कोर्टात
महाराष्ट्र सरकारकडून घेतली जाणारी एमएचसीईटी ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा ५ मे रोजी होणार असल्यामुळे राज्य सरकारने ‘नीट’ या वर्षी घेण्याला विरोध चालविला असून, आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.
१२ जण परीक्षेस मुकले
नवी मुंबईतील ऐरोलीमधील डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये ‘नीट’ परीक्षेसाठी गेलेल्या १२ विद्यार्थ्यांना उशिरा पोहोचल्याच्या कारणास्तव परीक्षेला मुकावे लागले. मात्र शाळा प्रशासनाने परीक्षा सुरू होण्याच्या तीन मिनिटांआधीच गेट बंद केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षेला मुकलेल्या या मुलांना पुढील दुसऱ्या सत्रात होणाऱ्या २४ जुलैची संधीही मिळणे अशक्य होणार आहे.
परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांत डहाणू तालुक्यातील पहाड गावची तेजल राऊत, श्रीवर्धन येथील निशिगंधा केळकर, बोरीवलीमधील निखिल मिश्रा, औरंगाबादचा वैभव फड, वांदे्र येथील मंथाशा यांचा समावेश होता. यासंदर्भात शाळा प्रशासनाची बाजू ऐकून घेण्यासाठी अनेकवेळा संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.