विवाहाला नाही वयाची सीमा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 04:53 AM2018-03-30T04:53:55+5:302018-03-30T04:53:55+5:30
उदयपूर शहराजवळील परग्यापाडा हे गाव तसं खूपच लहान. तिथं राहणारे देवदास यांचा मंगळवारी गावामध्ये विवाह झाला.
उदयपूर शहराजवळील परग्यापाडा हे गाव तसं खूपच लहान. तिथं राहणारे देवदास यांचा मंगळवारी गावामध्ये विवाह झाला. वयाच्या ८0 व्या वर्षी. मगदुबाई या ७६ वर्षांच्या महिलेशी त्यांनी विवाह केला.
विवाहाला देवदास यांची मुलं, नातूच नव्हे, तर पणतूही हजर होते. त्यांची पहिली पत्नीही आहे. पण ती आजारपणामुळे विवाहाला उपस्थित राहू शकली नाही. अर्थात पहिल्या पत्नीच्या संमतीनेच देवदास यांनी विवाह केला. विवाह सोहळा गावामध्येच मोठ्या उत्साहात साजरा झाला. सारे गावकरी झाडून या सोहळ्याला आले होेते. त्यांनी देवदास व मगदुबाई यांच्यासाठी आहेरही आणला होता. देवदास यांनी विवाहाच्या निमित्तानं गावजेवणच घातलं. त्यांचा मगदुबाईशी परिचय झाला ४६ वर्षांपूर्वी. शेजारच्या गावात राहणाऱ्या मगदुबाईला त्यांनी आपल्या घरी आणलं, तेव्हा पहिली पत्नी चंपाबाई हीही घरात राहत होती. काही काळ त्या दोघींसह देवदास राहत होते. नंतर त्यांचा मुलगा वेगळा झाला आणि चंपाबाईही मुलासोबत दुसरीकडे राहायला गेली. तेव्हापासून देवदास आणि मगदुबाई पती-पत्नीप्रमाणे एकत्रच राहत होते. आजच्या भाषेत सांगायचं तर लिव इन रिलेशनशिपमध्ये ते राहत होते. पण विवाह केला नाही. त्यांच्या एकत्र राहण्याला गावकºयांचा वा गाव पंचायतीचा आक्षेप नव्हता. पण देवदास व मगदुबाई यांचा विवाह झाला नसल्यानं गाव पंचायत त्यांना पती-पत्नी म्हणून मान्यता द्यायला तयार नव्हते. त्यामुळे पहिल्या पत्नीच्या संमतीनंतर दोघांनी विवाह केला. नवºया मुलाकडून आई-वडील नव्हे, तर मुलगा, सून, नातू, नात सून तसेच वयात आलेली नातवंड लग्नाला हजर होती. नवºया मुलीकडूनही सर्व नातेवाईक मंडळी आली होती. तीही अर्थात नवºया मुलीपेक्षा वयानं लहानच होती. कन्यादान कोणी केलं, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
इथे पत्नी मुलाहून लहान
अर्थात इथं पती-पत्नीच्या वयात फारसं अंतर नाही. पण काही दिवासांपूर्वी राजस्थानच्या उदयपूरजवळ जो विवाह झाला, त्यात पतीचं वय ८३ होतं, तर पत्नी अवघ्या ३0 वर्षांची. या पुरुषाचाही आधी विवाह झाला होता. त्याचा मुलगा २0 वर्षांपूर्वीच वारला. आपल्या संपत्तीचा कोणी तरी वारसदार हवा, यासाठी त्यानं ३0 वर्षाच्या मुलीशी हा विवाह केला. तोही पहिल्या पत्नीच्या संमतीनंच.