केजरीवालांचा गुजरातमधील गेम फसला; बडा आदिवासी सहकारी साथ सोडून गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 06:00 PM2022-09-12T18:00:13+5:302022-09-12T18:01:02+5:30
गुजरातमध्ये सध्या आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची सक्रियता खूप वाढली आहे. या वर्षात चार ते पाच वेळा गुजरातला भेट दिली आहे.
गुजरात निवडणुकीपूर्वी आपला मोठा झटका बसला आहे. गेल्या काही काळापासून आपगुजरातमध्ये ज्या सहकारी पक्षाच्या जोरावर निवडणुकीची तयारी करत आहे त्याच पक्षाने साथ सोडण्याची घोषणा केली आहे. भारतीय ट्रायबल पार्टीने आपसोबतची युती तोडली आहे.
आपसोबत जर युती केली तर आमच्या पक्षाला मोठे नुकसान होईल. आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जाईल, असे कारण ट्रायबल पार्टीने दिले आहे. यामुळे आम्ही एकट्यानेच निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरु केली आहे. हा झटका अशासाठी मोठा आहे, कारण आप भाजपाविरोधात गुजरातमध्ये मोठ्या ताकदीने उतरण्याची तयारी करत आहे. यामुळे ट्रायबल पक्षाने सोडून जाणे तिथे अनेक समीकरणे बदलवून टाकणार आहे.
गुजरातच्या १८२ पैकी २७ जागांवर आादिवासी समाजाचा प्रभाव आहे. या जागांवर जय-पराजय हा आदिवासी मतदारच घडवितात. यामुळे भाजपाच्या या व्होटबँकेला धक्का देण्यासाठी ट्रायबल पक्षाला सोबत घेण्याचा मोठा गेम अरविंद केजरीवाल यांनी खेळला होता. परंतू तो आता फसला आहे. निवडणुकीपूर्वीच ट्रायबल पक्षाने युती तोडली आहे. अद्याप आपकडून यावर कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही.
गुजरातमध्ये सध्या आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची सक्रियता खूप वाढली आहे. या वर्षात चार ते पाच वेळा गुजरातला भेट दिली आहे. प्रत्येक वेळी ते तिथल्या लोकांना वेगवेगळ्या हमी देत आहेत. आरोग्य, वीज, शिक्षणावर त्यांनी ही आश्वासने दिली आहेत. काही दिवसांत गुजरातमध्येही 'आप'ची यात्रा सुरु होणार आहे, या यात्रेची सुरुवात मनीष सिसोदिया करणार आहेत. गुजरातमध्ये आता प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. यातच आज आपने आपल्या कार्यालयावर गुजरात पोलिसांनी छापा टाकल्याचा आरोप केला आहे. यावर गुजरात पोलिसांनी आम्हाला हे तुमच्याकडूनच कळल्याचे म्हटले आहे. गुजरात पोलीस तासभर शोधाशोध करत होते, त्यांना काही सापडले नाही म्हणून ते पुन्हा येणार असल्याचे धमकावून गेल्याचा आरोप आपने केला होता.
गुजरातमधील जनतेकडून आम्हाला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमध्ये 'आप'चे वादळ निर्माण झाले आहे. दिल्लीनंतर आता गुजरातमध्येही छापेमारी सुरू केली आहे. दिल्लीत काही सापडले नाही, गुजरातमध्येही काही सापडले नाही. आम्ही कट्टर प्रामाणिक आणि देशभक्त लोक आहोत, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.