कार घेऊन निघाला अन् वाटेत अर्धवट पूलावरून कारसह खाली कोसळला; ड्रायव्हरचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 10:12 AM2023-05-30T10:12:16+5:302023-05-30T10:12:37+5:30
या ठिकाणी सुरू असलेल्या कामांबाबत कोणतीही मार्गदर्शक चिन्हे अथवा सूचना नव्हती आणि बॅरिकेड्सही हटवण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
नवी दिल्ली - पूर्व दिल्लीच्या कृष्णा नगरमध्ये राहणारे ४२ वर्षीय जगदीप सिंह त्यांची कार घेऊन घरातून बाहेर पडले. रस्त्यावरून जाताना बारापुला एलिवेटेड रोडवर काही अंतरावर गेले असताना अचानक त्यांचे पाय ब्रेककडे गेले. परंतु काही कळण्याच्या आतच कारसह ते ३० फुटावरून खाली कोसळले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले त्याठिकाणी फोनचा आवाज येत होता. जगदीप सिंह बेशुद्ध अवस्थेत पडले होते. पोलिसांना फोन उचलला तो जगदीप यांच्या पत्नीचा होता. घटनेबाबत त्यांनी फोनवरून माहिती दिली.
ना फलक ना बॅरिकेड
यानंतर जगदीपला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जगदीप नोएडा येथील एका फर्ममध्ये काम करायचा. हा अपघात होईल याची कल्पनाही कुणी केली नव्हती. जगदीप सिंह उड्डाणपुलावरून कार घेऊन जाताना समोर रस्ता असल्याचे जाणवले पण अचानक पूल मध्यभागी संपला. या पुलाचे बांधकाम सुरू होते. परंतु तिथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम सुरू असल्याचा बोर्ड किंवा बॅरिकेडिंग, सूचना फलक नव्हता. रस्त्याचे हे बांधकाम बनविण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या कामांबाबत कोणतीही मार्गदर्शक चिन्हे अथवा सूचना नव्हती आणि बॅरिकेड्सही हटवण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पीडब्ल्यूडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पूलाचा हा भाग बांधकामाधीन आहे, हे स्पष्ट दिसून येते. याशिवाय, रॅम्पवर १५ एक्स्टेंशन आहेत जे अद्याप लावलेले नाहीत. त्यामुळे लोखंडी सळ्या बाहेर चिकटल्या आहेत. रॅम्पवर गाडी चालवणे अवघड आहे. पीडित जगनदीप सिंग याने रॅम्पच्या अगदी शेवटपर्यंत गाडी चालवली असे पीडब्लूडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
प्रत्यक्षदर्शीने ऐकला आवाज
यमुना खादर येथील रहिवासी असलेले ४९ वर्षीय देवेंद्र म्हणाले की, मी एका नर्सरीजवळ बसलो असताना मला मोठा आवाज आला. मला वाटले उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला आहे, पण नंतर एक कार खाली पडून पलटी झाल्याचे दिसले. देवेंद्र आणि इतर काही जण गाडी नीट करण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या व्यक्तीने, ज्याने सीट बेल्ट लावला होता, त्याने कोणतीही हालचाल दाखवली नाही. डोक्यातून रक्त वाहत होतं. गाडी खाली असलेल्या झोपडपट्टीवर पडली असती तर जीवितहानी अधिक झाली असती, असे रहिवाशांनी सांगितले.