निवडणुकांत बाटली नको! रोख रक्कम, देशी तूप घ्या; जयहिंद सेनेचे प्रमुख नवीन यांचे वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 06:03 AM2024-04-16T06:03:47+5:302024-04-16T06:04:36+5:30
चंडीगडमधील सेक्टर सहामधील उद्यानात आपल्या कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात त्यांनी ही विधाने केली.
बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : लोकसभा निवडणुकांमध्ये कोणाकडूनही रोख पैसे, देशी तूप भेट म्हणून घ्या; पण दारूची बाटली घेऊ नका. कारण निवडणुकांदरम्यान नकली किंवा महागड्या बाटल्यांतून स्वस्त किमतीचीही दारू दिली जाण्याची शक्यता असते. त्यापेक्षा रोख पैसे बिनदिक्कतपणे घ्या, असे वादग्रस्त विधान जयहिंद सेनेचे प्रमुख नवीन जयहिंद यांनी केले आहे. या वक्तव्याची सर्वत्र चर्चा आहे.
चंडीगडमधील सेक्टर सहामधील उद्यानात आपल्या कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात त्यांनी ही विधाने केली. नवीन जयहिंद म्हणाले की, यंदाच्या लोकसभा निवडणुकांत जातीपातीच्या आधारावर आपण मतदान करायचे नाही. निवडणुकांत उमेदवारांना त्यांनी केलेल्या कामांसंदर्भात मतदारांनी प्रश्न विचारले पाहिजेत. त्यासाठी लोकजागृती मोहिमेचे आयोजन करण्याकरिता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची २८ एप्रिल रोजी बैठक बोलावली आहे.
आम आदमी पक्षाचे हरयाणा प्रदेशाचे संयोजक म्हणून काम पाहिलेल्या नवीन जयहिंद यांनी याआधी लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला हाेता. लोकांना राजकीयदृष्ट्या जागृत करण्यासाठी त्यांनी जयहिंद सेनेची स्थापना केली.