बुलेट ट्रेन नव्हे, तर जवानांना बुलेट प्रूफ जॅकेटची गरज- अखिलेश यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 08:11 AM2019-02-19T08:11:33+5:302019-02-19T08:12:11+5:30
जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला.
लखनऊ- जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारतमातेचे 40 जवान शहीद झाले. या घटनेसंदर्भात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आज देशाला बुलेट ट्रेनची गरज नाही. त्यापेक्षा जवानांना बुलेट प्रूफ जॅकेटची जास्त गरज आहे.
अखिलेश यादव म्हणाले, यंत्रणा वारंवार अपयशी का होतंय?, तुम्ही एखाद्याच्या जिवाची नुकसानभरपाई करू शकत नाही. पूर्ण देश जवानांबरोबर आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचे कार्यक्रम रद्द केले, सत्ताधारी पक्षानंही असंच करणं अपेक्षित आहे. तसेच सत्ताधाऱ्यांनी एक मजबूत आणि दीर्घकालीन रणनीती तयार करायला हवी.
पुलवामा हल्ल्यात यूपीतले 12 जवान शहीद
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या 40 जवानांपैकी 12 जवान उत्तर प्रदेशातील आहेत. जवान शहीद झाल्याची बातमी धडकताच गावांवर शोककळा पसरली. योगी सरकारनं शहीद जवानांना 25-25 लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. तसेच जवानांच्या नावानं त्यांच्या गावच्या रस्त्याचं नामकरणही करण्यात येणार आहे.