नको बंगला, नको सुरक्षा, वाजपेयींच्या कुटुंबीयांनी नाकारल्या सरकारी सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 02:09 PM2018-11-25T14:09:25+5:302018-11-25T14:41:36+5:30
अटलजींच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान कार्यालयास एका पत्राद्वारे कळवले आहे.
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या साध्या अन् सरळ स्वभावाची सर्वांनाच ओळख होती. तर, देशाचे पंतप्रधानपद भुषावूनही 2004 मध्ये त्यांची संपत्ती 50 लाख एवढी होती. अटलजींनी कधीही सरकारचा स्वहितसाठी फायदा करुन घेतला नाही. आता, अटलबिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबीयांनीही अटलजींच्या विचारांची कृती आपल्या कार्यातून दाखवून दिली. कारण, सरकारकडून मिळणाऱ्या सर्वच सुविधा अटलजींच्या कुटुंबीयांनी नाकारल्या आहेत.
आमचे कुटुंब सक्षमपणे आपला खर्च भागवू शकते. त्यामुळे आम्हाला सरकारी सुविधांची आवश्यकता नाही, असे अटलजींच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान कार्यालयास एका पत्राद्वारे कळवले आहे. वायपेयी यांच्या कुटुंबात त्यांची दत्तक मुलगी नमिता, जावई रंजन भट्टाचार्य, मुलगी निहारिका आणि इतर सदस्य आहेत. हे कुटुंब वाजपेयींसोबतच दिल्लीतील लुटियंस झोनच्या कृष्ण मेनन मार्गवरील सरकारी निवासस्थानात राहात आहे. मात्र, आता सरकारने हे घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी पंतप्रधानांच्या कुटुबीयांस एसपीजी सुरक्षासह अनेक प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येतात. सध्या, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि एच.डी. देवेगौडा यांच्या कुटुबीयांना या सुविधा मिळत आहेत. तर राजीव गांधींचे कुटुंब असल्याने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या माजी पंतप्रधानांचे कुटुंबीय असल्यामुळए या सुविधा मिळत आहेत.
या सुविधा मिळतात माजी पंतप्रधानांच्या कुटुंबीयांस
माजी पंतप्रधानांच्या कुटुंबीयास मोफत निवासस्थान, मोफत आरोग्य योजना, सरकारी स्टाफ, मोफत देशांतर्गत विमानप्रवास, मोफत रेल्वेप्रवास आणि एसपीजी सुरक्षांसह इतरही अनेक सुविधांचा लाभ मिळतो.