विमानांची भरारी आजपासून पूर्ण क्षमतेने; आसन मर्यादेची अट रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 09:20 AM2021-10-18T09:20:45+5:302021-10-18T09:21:22+5:30
तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांना काहीसा दिलासा
मुंबई : आजपासून देशांतर्गत विमाने पूर्ण क्षमतेसह उड्डाण करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवासासाठी लागू केलेली आसन मर्यादा हटविण्याचा निर्णय केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतला असून, १८ ऑक्टोबरपासून देशभरात त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
हवाई मार्गाने कोरोनाचा प्रसार सर्वाधिक होत असल्याची चर्चा पहिल्या लाटेच्या काळात होती. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा आणि अंतर नियम पालनासाठी विमानातील प्रवासी क्षमतेवर मर्यादा आणण्यात आल्या. लॉकडाऊनच्या दरम्यान देशांतर्गत उड्डाणांवर पूर्ण बंदी घातल्यानंतर, २५ मे, २०२० रोजी ३३ टक्के आसन क्षमतेसह ऑपरेशन्स सुरू करण्यात आली. डिसेंबर, २०२० पर्यंत हळूहळू ही मर्यादा ८० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली. मात्र, दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढल्यामुळे १ जून, २०२१ रोजी पुन्हा एकदा वाहन क्षमता ५० टक्क्यांवर आणण्यात आली. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या विमान कंपन्यांसमोर पेच निर्माण झाला. जूनपासून दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्याने प्रवासी क्षमता पूर्ववत करण्याची मागणी विमान कंपन्यांकडून सातत्याने करण्यात येत होती.
कोरोना पूर्वकाळाच्या दिशेने
गेल्या काही दिवसांपासून हवाई प्रवाशांची संख्या कोरोना पूर्वकाळाच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे.
शिवाय सणासुदीला विमान प्रवासाची मागणी वाढल्यामुळे आसन क्षमतेची अट अडथळा ठरू लागली आहे. मुंबई, दिल्लीसारख्या महत्त्वाच्या विमानतळांवर गर्दी वाढू लागल्यामुळे, तिच्या व्यवस्थापनासाठी ही अट काढून टाकण्यात आली आहे.