सीसीटीव्ही, बायोमेट्रिकची तोडफोड नाही, ‘आरटीआय’अंतर्गत जेएनयूची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 05:28 AM2020-01-22T05:28:26+5:302020-01-22T05:28:51+5:30
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील बायोमेट्रिक यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरा आणि सर्व्हर रूमची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोणतीही तोडफोड झाली नसल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे.
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील बायोमेट्रिक यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरा आणि सर्व्हर रूमची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोणतीही तोडफोड झाली नसल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ३ जानेवारीला विद्यार्थ्यांनीच या यंत्रणांची तोडफोड केल्याचा विद्यापीठ प्रशासनाचा दावा खोटा असल्याचेही उघडकीस आले आहे.
नॅशनल कॅम्पेन फॉर पीपल्स राईट टू इन्फॉर्मेशन (एनसीपीआरआय) या संघटनेचे सदस्य सौरव दास यांनी याप्रकरणी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. जेएनयूमधील यंत्रणेचे मुख्य सर्व्हर सेंटर फॉर इन्फॉर्मेशन (सीआयएस) इमारतीत आहे. मात्र, वीज गेल्यामुळे ३ जानेवारीला सर्व्हर बंद पडल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचे ५ जानेवारीचे सलग चित्रीकरण उपलब्ध नसल्याचेही विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. ५ जानेवारीलाच विद्यापीठ परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला होता. जेएनयू प्रशासनाने या प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात ३ जानेवारीला विद्यार्थ्यांच्या एका गटाने सीआयएस इमारतीत घुसून मुख्य यंत्रणा (सर्व्हर रुम), सीसीटीव्ही, बायोमेट्रिक यांची तोडफोड केल्याचा दावा केला
होता.
विद्यार्थ्याला मारहाण
जेएनयूमध्ये सोमवारी नर्मदा वसतिगृहात तीन अज्ञातांनी रागीब इकराम या विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या रागीबला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेएनयू विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष आयशी घोष यांनी अभाविपचा या हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप केला आहे.