कोरोना इफेक्ट! यंदाचा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुण्यांविना; ५५ वर्षांत प्रथमच असं घडणार
By कुणाल गवाणकर | Published: January 14, 2021 09:03 PM2021-01-14T21:03:52+5:302021-01-14T21:04:24+5:30
१९६६ नंतर प्रथमच प्रमुख पाहुण्यांविना साजरा होणार प्रजासत्ताक दिनाचा सोहळा
नवी दिल्ली: यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला कोणत्याही देशाचे प्रमुख उपस्थित नसतील. कोरोना संकटामुळे यंदाच्या सोहळ्याला कोणत्याही देशाचे अध्यक्ष किंवा पंतप्रधान म्हणून उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. कोरोना संकट असल्यानं कोणत्याही देशाच्या प्रमुखाला निमंत्रित केलं गेलं नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. त्यामुळे ५५ वर्षांत पहिल्यांदाच देशाचा प्रजासत्ताक दिन कोणत्याही प्रमुख पाहुण्याशिवाय साजरा होईल.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र ब्रिटनमध्ये कोरोनानं धुमाकूळ घातल्यानं जॉन्सन यांनी भारत दौरा रद्द केला. जगातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे कोणत्याही देशाच्या प्रमुखांना आमंत्रित करणं तितकंसं सोपं नाही.
गेल्या वर्षी फेब्रुवारीत अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी अहमदाबादमध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमामुळे कोरोना पसरल्याचा आरोप करत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. अमेरिकेत कोरोनाचा फैलाव वाढला असताना ट्रम्प यांना निमंत्रित करण्याची काय गरज होती, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.
याआधी १९६६ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला निमंत्रित केलं गेलं नव्हतं. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं ताश्कंदमध्ये निधन झाल्यानं हा निर्णय घेतला गेला. घटनात्मक गरजा लक्षात घेऊन इंदिरा गांधींनी प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी पंतप्रधानाची शपथ घेतली. त्यावेळी देशात अतिशय साधेपणानं प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.