अविश्वास अन् सोरोसवरून गदाराेळ; लोकसभा, राज्यसभेतील कामकाजात दिवसभर अडथळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 06:08 IST2024-12-13T06:08:24+5:302024-12-13T06:08:33+5:30

विराेधकांची निदर्शने, सत्ताधारी आक्रमक

No-confidence motion and uproar over Soros; Disruptions in Lok Sabha, Rajya Sabha proceedings throughout the day | अविश्वास अन् सोरोसवरून गदाराेळ; लोकसभा, राज्यसभेतील कामकाजात दिवसभर अडथळे

अविश्वास अन् सोरोसवरून गदाराेळ; लोकसभा, राज्यसभेतील कामकाजात दिवसभर अडथळे

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : संसदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सोरोस प्रकरण व राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांच्याविरोधातील अविश्वासाच्या ठरावावरून गुरुवारी सत्ताधारी व विरोधकांनी गोंधळ सुरू झाला. त्यानंतर लोकसभेचे कामकाज काही तासांसाठी तर राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले. लोकसभेत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी अमेरिकेतील अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी निगडीत मुद्दा उपस्थित केल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज स्थगित झाली. सोरोस प्रकरण व धनखड यांच्याविरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव या मुद्यांवरून गदारोळ उडाल्याने राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब झाली.

धनखड यांना पदावरून हटवण्याशी संबंधित नोटीस व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचे जॉर्ज सोरोससोबतचे संबंध या मुद्यावरून राज्यसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे सुरुवातीला काही वेळासाठी तर दुपारी दोन वाजेनंतर दिवसभरासाठी राज्यसभेचे कामकाज तहकूब झाले.  शून्य प्रहरादरम्यान सभापती धनखड यांनी नियम २६७ अंतर्गत वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी एकून सहा नोटिसा प्राप्त झाल्याचे सांगितले. मात्र, आपण त्या सर्व फेटाळून लावल्याचे सभापती म्हणाले. त्यानंतर विरोधक व सभापतींमध्ये खडाजंगी उडाली. त्यानंतर सभापतींनी सभागृह नेते जे.पी. नड्डा यांना बोलण्याची संधी दिल्यानंतर विरोधकांनी जास्त गोंधळ घातला. 

सदस्यांनी वैयक्तिक टीका करू नये : लाेकसभाध्यक्ष बिर्ला
nतृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबद्दल केलेले वक्तव्य दुर्दैवी असल्याचे नमूद करत कोणत्याही सदस्यांनी अशा प्रकारे वैयक्तिक टीका करू नये, असे आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले. 
nकोणत्याही सदस्याने महिलांवरून टिप्पणी करू नये. अशी वक्तव्ये सभागृहाच्या प्रतिष्ठेसाठी योग्य नसल्याचे ते म्हणाले.

सत्ताधाऱ्यांनी काॅंग्रेसला केले लक्ष्य
nसभापतींविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी सभागृहात निषेध प्रस्ताव मांडण्याची गरज नड्डांनी व्यक्त केली. त्यानंतर राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे चर्चेसाठी उठले. त्यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर गोंधळात अधिकच भर पडली. त्यानंतर दुपारी दोन वाजून १२ मिनिटांच्या सुमारास राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब झाली.
nदुसरीकडे लोकसभेत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी जॉर्ज सोरोस प्रकरणावरून काँग्रेसला लक्ष्य केले. दुबेंनी एका अहवालाचा हवाला देत ‘ओवरसीज फ्रेंड्स ऑफ काँग्रेस'च्या प्रमुखांनी १५० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यानंतर गोंधळाला सुरुवात झाल्यानंतर दुपारी १२ वाजून १८ मिनिटाने एक वाजेपर्यंत कामकाज स्थगित झाले. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस खासदार एस. ज्योतिमणी यांनी दिल्लीच्या सीमेलगत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला.
nएका उद्योगपतीचे नाव घेत केंद्र सरकार त्यांना वाचण्याचा प्रयत्न करत आहे. येथे शेतकऱ्यांचे संरक्षण केले जात नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, सभागृहात उद्योगपतीचे नाव घेतल्यामुळे पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी तुम्ही लोकसभेत उपस्थित नसलेल्या उद्योगपतीचे नाव घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट करत ते नाव कामकाजातून हटविण्याचे निर्देश दिले. 

अदानी प्रकरणावरून विरोधकांची निदर्शने
अदानी समूहाशी निगडीत प्रकरणावरून संसद परिसरात गुरुवारी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी निदर्शने केली. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलासह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या मकरद्वारासमोर येत निदर्शन केली.
या वेळी खासदारांच्या हातात ‘देश नहीं बिकने देंगे' हा मजकूर लिहिलेले फलक होते. या वेळी विरोधकांनी संबंधित प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली.
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधीसह अनेक वरिष्ठ नेते या निदर्शनात सहभागी झाले होते. यापूर्वी बुधवारी इंडिया आघाडीच्या खासदारांनी अनोखे आंदोलन करत भाजप व त्यांच्या सहकारी पक्षाच्या खासदारांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले होते.

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा : काँग्रेस
nदिल्ली सीमेलगत शंभू व खनौरी बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या तत्काळ पूर्ण करण्याची मागणी लोकसभेत काँग्रेस खासदार एस. ज्योतिमणी यांनी केली. 
nशेतीमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी, कर्ज माफी, पेशन्य, लखीमपुरी खीरी हिंसाचारातील पीडितांना न्याय या शेतकऱ्यांच्या मागण्या असल्याचे शून्य प्रहराच्या तासात बोलताना ज्योतिमणी यांनी स्पष्ट केले.

Web Title: No-confidence motion and uproar over Soros; Disruptions in Lok Sabha, Rajya Sabha proceedings throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.