No Confidence Motion : आंध्र प्रदेशचे विभाजन चुकीच्या पद्धतीने झाले- टीडीपीने मांडला अन्यायाचा पाढा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 11:36 AM2018-07-20T11:36:09+5:302018-07-20T11:36:38+5:30
तेलगू देसमचे खासदार जयदेव गाला यांनी लोकसभेमध्ये अविश्वास दर्शक ठराव मांडताना आंध्र प्रदेशच्या व्यथा मांडल्या. जयदेव गल्ला यांनी आपली बाजू मांडताना लोकसभेत आंध्र प्रदेशवर कसा अन्याय झाला याचाच पाढा वाचून दाखवला.
नवी दिल्ली- तेलगू देसमचे खासदार जयदेव गाला यांनी लोकसभेमध्ये अविश्वास दर्शक ठराव मांडताना आंध्र प्रदेशच्या व्यथा मांडल्या. जयदेव गल्ला यांनी आपली बाजू मांडताना लोकसभेत आंध्र प्रदेशवर कसा अन्याय झाला याचाच पाढा वाचून दाखवला. तेलंगण हे नवे राज्य नसून आंध्र प्रदेश हे नवे राज्य आहे कारण सर्वात जास्त आमचे नुकसान झाले आहे असे जयदेव यांनी लोकसभेत मत मांडले
ऊर्जा असो वा पायाभूत सुविधा प्रत्येक क्षेत्रामध्ये आंध्र प्रदेशावर अन्याय झाला अशी बाजू गाला यांनी मांडली. यावेळेस तेलंगण राष्ट्र समितीच्या खासदारांनी त्यांच्या भाषणाला आक्षेप घेताना विरोध सुरु केला. यामुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे गाला हे सरकारचा विरोध करत आहेत की तेलंगणचा हेच स्पष्ट होत नव्हते. त्यातच गाला यांनी तेलंगण राज्य निर्मितीचे विधेयक अत्यंत चुकीच्या पद्धतीने लोकसभेत मांडले गेले आणि ते अयोग्य पद्धतीने बळाचा वापर करुन संमत केले गेले असा आरोप जयदेव यांनी केला. गाला यांच्या या विधानाचा तेलंगण राष्ट्र समितीने विरोध करत आरडाओरडा सुरु केला. यामुळे सभागृहात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तेलंगण राष्ट्र समितीच्या खासदारांनी वेलमध्ये येत विरोध करायला सुरुवात केली. सभागृहात वारंवार येणाऱ्या व्यत्ययामुळे सभापती सुमित्रा महाजन यांना टीआरएसच्या खासदारांना जागेवर जाण्याच्या सूचना द्याव्या लागल्या.
जयदेव यांनी उर्वरित भाषणामध्येही उर्वरित भाषणामध्ये केंद्र सरकारच्या कामावर बोलण्याऐवजी आंध्र प्रदेशच्या स्थितीवर बोलणे पसंत केले. आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मागत आहोत. काँग्रेसने तेलगू तल्लीचे दोन तुकडे केले असा थेट आरोप त्यांनी केला. 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशला वाचवण्याची भाषा केली होती म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो होतो मात्र त्यांनी नंतर आपले आश्वासन पाळले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.