No Confidence Motion: शिवसेनेचा मोदींवर 'विश्वास', 'मातोश्री'वरून गेला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 02:24 PM2018-07-19T14:24:24+5:302018-07-19T14:40:27+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चांना उत आला होता.

No Confidence motion : Shivsena has decided to vote in favor of the Narendra Modi government | No Confidence Motion: शिवसेनेचा मोदींवर 'विश्वास', 'मातोश्री'वरून गेला आदेश

No Confidence Motion: शिवसेनेचा मोदींवर 'विश्वास', 'मातोश्री'वरून गेला आदेश

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चांना उत आला होता. मात्र अविश्वास प्रस्तावादरम्यान मोदी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून, सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी उपस्थित राहण्याचा व्हीप आपल्या खासदारांना बजावला आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावापूर्वीच मोदी सरकारचे पारडे जड झाले आहे.

केंद्र आणि राज्यात सत्तेत असूनही गेल्या काही काळापासून सातत्याने भाजपाविरोधात भूमिका घेणारी शिवसेना अविश्वास प्रस्तावाबाबत काय निर्णय घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. शिवसेना या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करेल किंवा या प्रस्तावावर बहिष्कार टाकेल अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शिवसेना नेतृत्वाने अविश्वास प्रस्तावाबाबत भूमिका स्पष्ट करताना केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यासंदर्भातील व्हीप सेनेच्या लोकसभेतील खासदारांना बजावण्यात आला आहे. दरम्यान, अविश्वास प्रस्तावाबाबत अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


 मोदी सरकारच्या विरोधातील पहिला अविश्वास प्रस्ताव लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दाखल करून घेतला असून, त्यावर शुक्रवारी चर्चा होणार असून, त्यानंतर मतदान घेतले जाईल. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलुगू देसम, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या व महिलांवरील बलात्कार रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेसतर्फे अविश्वास ठराव देण्यात आला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही जमावाचा हिंसाचार या विषयावर अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती.

Web Title: No Confidence motion : Shivsena has decided to vote in favor of the Narendra Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.