No Confidence Motion: सोनिया गांधी यांचे गणित कच्चे- अनंत कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 05:09 PM2018-07-19T17:09:19+5:302018-07-19T17:09:28+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे अविश्वास दर्शक ठरावावर मात करण्याइतके संख्याबळ असूनही सोनिया गांधी यांनी काल केलेल्या या विधानामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते.
नवी दिल्ली- कोण म्हणतंय आमच्याकडे संख्याबळ नाही? अशा शब्दांमध्ये अविश्वास ठरावाच्या भविष्याबद्दल मत मांडणाऱ्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भाजपाने आज प्रत्युत्तर दिले आहे. सोनिया गांधी यांचे गणित कच्चे आहे अशा शब्दांमध्ये अनंत कुमार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
Sonia ji's maths is weak. They had calculated similarly in 1996. We know what happened then. Their calculation is wrong yet again. Modi govt has majority both inside & outside Parliament. NDA will vote against #NoConfidenceMotion. NDA+ will also support us: Union Min Ananth Kumar pic.twitter.com/R4D5IinNox
— ANI (@ANI) July 19, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे अविश्वास दर्शक ठरावावर मात करण्याइतके संख्याबळ असूनही सोनिया गांधी यांनी काल केलेल्या या विधानामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. त्याबाबत बोलताना अनंत कुमार यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले,'' सोनियाजींचे गणित कच्चे आहे. त्यांनी याचप्रकारे 1996 साली आकडेमोड केली होती. पुढे काय झालं हे आम्हाला माहिती आहे. त्याची आकडेमोड पुन्हा एकदा चुकीची ठरेल. मोदी सरकारकडे संसदेत आणि संसदेबाहेरही बहुमत आहे. आम्हाला सर्व दिशांनी पाठिंबा मिळेल हे तुम्हाला दिसेलच.''
1999 साली सोनिया गांधी यांनी आमच्याकडे 272 सदस्य असून अजून आमच्याकडे लोक येत आहेत अशाप्रकारचे विधान केले होते. मात्र अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा एका मताने पराभव केल्यानंतर प्रत्यक्षात त्यांचा पक्ष सत्ता स्थापन करु शकला नाही.
1999 साली काय झाले होते-
1999 साली पंतप्रधान वाजपेयी यांनी सर्वात प्रथम अविश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. यावेळेस त्यांचे सरकार केवळ एका मताने पराभूत झाले. बहुजन समाज पक्षाने भारतीय जनता पार्टीस मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी आयत्यावेळेस भाजपा सरकाविरोधात भूमिका घेतली. हे सरकार दलितविरोधी आहे असे सांगत या पक्षाने सरकारला विरोध केला होता.
अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कोसळण्याचे खरे कारण जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार सैफुद्दिन सोझ यांनी अचानक अविश्वास ठरावाला पाठिंबा देऊन रालोआ सरकारविरोधात मतदान केले. यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले सोझ सध्या काँग्रेसमध्ये आहेत. त्याहून धक्कादायक घटना लोकसभेत त्यावेळेस घडली होती ती म्हणजे गिरिधर गमांग यांनी लोकसभेत येऊन सरकारविरोधात मतदान करणे. गमांग ओडिशाचे मुख्यमंत्री होते, त्यांनी ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला होता, मात्र त्यांनी लोकसभेचे सदस्यत्व सोडले नव्हते. त्यांच्या एका मताचाही रालोआ सरकारला फटका बसला. आज हेच गमांग भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत.