No Confidence Motion : सुमित्रा महाजन यांनी टोचले सर्व खासदारांचे कान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 02:01 PM2018-07-20T14:01:23+5:302018-07-20T14:01:44+5:30
अविश्वासदर्शक ठरावावरील भाषणामध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एकमेकांवर थेट आरोप करण्यात आल्यानंतर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सर्व खासदारांना वारंवार अयोग्य शब्दांचा वापर करुन नका अशी विनंती केली.
नवी दिल्ली- अविश्वासदर्शक ठरावावरील भाषणामध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एकमेकांवर थेट आरोप करण्यात आल्यानंतर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सर्व खासदारांना वारंवार अयोग्य शब्दांचा वापर करुन नका अशी विनंती केली. मात्र तहकुबीनंतर सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यावर महाजन यांनी सर्व खासदारांची शाळाच घेतली.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर थेट आरोप करताना कोणतेही आरोप समोर न ठेवल्यामुळे भाजपा खासदारांनी त्यास आक्षेप घेतला. यावर महाजन यांनी कोणतेही थेट आरोप तसेच ज्यात एखाद्या रक्कमेचा उल्लेख केला असल्यास तसे पुरावेही देणे आवश्यक आहे असे महाजन यांनी सर्व सभागृहाला समजावून सांगितले. जर एखाद्या मंत्र्यांवर आरोप होतो तेव्हा त्यांना उत्तर देण्याचा नैसर्गिक अधिकार मिळतो. अशा वेळेस बोलणाऱ्या व्यक्तीने खाली बसून ज्याच्यावर आरोप केला आहे (संरक्षणमंत्री) त्याचे उत्तर ऐकले पाहिजे. तसे न केल्यास तुमच्या भाषणानंतर संरक्षणमंत्री यांचे उत्तर मला व सभागृहाला ऐकावे लागेल. असे सांगत पुन्हा एकदा महाजन यांनी जरा सांभाळून भाषण केले पाहिजे सल्ला राहुल गांधी आणि खासदारांना दिला.
सर्व खासदारांना उद्देशून महाजन म्हणाल्या,'' मी गेली अनेक वर्षे लोकसभेत आहेत, अत्यंत मोठ्या ज्येष्ठ नेत्यांची भाषणे मी ऐकली आहेत. एखादा आरोप त्यांनी केला की ते भाषण थांबवून संबंधित व्यक्तीचे म्हणणे ऐकत असत. असे कण्यात काहीही कमीपणाचे नाही.''