विरोधकांचा गदारोळ, सभात्याग, त्यानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरबाबत बोलले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 07:12 PM2023-08-10T19:12:52+5:302023-08-10T19:13:48+5:30
Narendra Modi: लोकसभेत विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला (No Confidence motion) उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर भाष्य केले.
लोकसभेत विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर भाष्य केले. मणिपूरच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे. त्यांनी सरकार आणि देशाची चिंता सभागृहासमोर मांडली आहे. तिथे ज्या प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत ते पाहता मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य एक दिवस नक्की उगवेल, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवातीच्या भाषणात मणिपूरचा उल्लेख न केल्याने घोषणाबाजी करत काँग्रेससह विरोधी पक्षांनी सभात्याग केला.
नरेंद्र मोदी म्हणाले की, मणिपूरच्या स्थितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सर्व विषय विस्तारपूर्वक मांडले. सरकार आणि देशाची चिंता देशासमोर मांडली आहे. त्यामध्ये देशाच्या जनतेला जागरुक करण्याचा प्रयत्न होता. मात्र विरोधी पक्षांनी या विषयावर राजकारण केलं, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला.
मोदी म्हणाले की, मणिपूरमध्ये कोर्टाचा एक निर्णय आला. त्यामुळे दोन गटात तणावांच वातावरण निर्माण झालं. त्यात अनेकांनी आपल्या नातेवाईकांना गमावलं आहे. महिलांसोबत अक्षम्य अपराध घडले आहेत. हे अपराध अक्षम्य आहेत. या दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र मणिपूरमध्ये ज्या प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत, ते पाहता येत्या काळात मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य नक्की उगवणार आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.