Corona vaccination : 12 ते 14 वर्षांच्या मुलांना लस कधीपासून मिळणार? जाणून घ्या, सरकारने काय सांगितले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 11:31 AM2022-01-18T11:31:33+5:302022-01-18T11:33:21+5:30
Corona vaccination : 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्यापासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
नवी दिल्ली : भारतात करोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) लसीकरण (Vaccination) मोहीम वेगाने सुरू आहे. दरम्यान, 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्यापासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, या वृत्ताचे केंद्र सरकारने खंडन केले आहे. परंतू 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना लसीचे डोस देण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
#COVID19 | No decision yet by the union health ministry on vaccination for children of age group 12-14 years: Official sources pic.twitter.com/gUUmIEWSIp
— ANI (@ANI) January 18, 2022
सहव्याधीग्रस्त मुलांना प्राधान्याने लस द्या
5 ते 14 वर्षे वयोगटातील सहव्याधी असलेल्या मुलांना कोरोनाचा तीव्र स्वरूपाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा मुलांना केंद्र सरकारने प्राधान्याने कोरोना लस द्यावी, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.
3.5 कोटींहून अधिक मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत 15 ते 18 वर्षे वयोगटातील 3.5 कोटींहून अधिक मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. देशात 3 जानेवारी रोजी, 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लस सुरू करण्यात आली. ही मोहीम अतिशय वेगाने राबविली जात आहे. देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील 7.4 कोटी मुले असून त्या सर्वांना या महिन्याच्या अखेरीपर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस देण्याचे लक्ष्य आहे. दरम्यान, 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना सध्या भारत बायोटेकने बनविलेली कोव्हॅक्सिन लस देण्यात येते. 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीनसाठी केंद्र सरकारने कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे.
गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 38 हजार 18 नवीन रुग्णांची नोंद
देशात कालच्या तुलनेत आज काही प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 38 हजार 18 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे 310 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात 1 लाख 57 हजार 421 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. सोमवारी देशात 2 लाख 58 हजार 89 रुग्णांची नोंद झाली होती. त्यामानाने आज 20 हजार 71 रुग्ण कमी झाले आहेत.