भाजप सत्तेत येईपर्यंत रात्रीचे जेवण बंद, हार-साफा सुद्धा घालणार नाही - सतीश पुनिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 01:36 PM2022-02-04T13:36:24+5:302022-02-04T13:48:41+5:30
Satish Poonia : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी अलिगडमध्ये एका निवडणूक रॅलीला सतीश पुनिया यांनी संबोधित केले.
अलिगड : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh Assembly Election 2022) सर्व राजकीय पक्षांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत येण्यासाठी नेते दावे-आश्वासने काहीही करायला तयार असतात. यादरम्यान, राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया (Satish Poonia) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. 'जोपर्यंत राजस्थानमध्ये भाजप सरकार स्थापन करत नाही, तोपर्यंत हार आणि साफा घालणार नाही, एवढेच नाही तर रात्रीचे जेवण न करण्याचा पवित्राही सतीश पुनिया यांनी घेतला आहे. म्हणजेच जोपर्यंत राजस्थानमध्ये भाजप सरकार स्थापन करत नाही तोपर्यंत सतीश पुनिया हे रात्रीचे जेवण करणार नाहीत.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी अलिगडमध्ये एका निवडणूक रॅलीला सतीश पुनिया यांनी संबोधित केले. यावेळी सतीश पुनिया यांनी सांगितले की, राजस्थानमध्ये पक्षाची सत्ता येईपर्यंत मी हार घालणार नाही आणि रात्रीचे जेवण करणार नाही. यादरम्यान भाजप नेते सतीश पुनिया यांनी पुढील निवडणुकीत काँग्रेसला उखडून टाकण्याचा संकल्पही केला.
रॅलीला संबोधित करताना सतीश पुनिया म्हणाले, 'मी संकल्प केला आहे की जोपर्यंत आपण 2023 मध्ये राजस्थानमध्ये काँग्रेसला उखडून टाकत नाही आणि भाजपला प्रचंड बहुमत देत नाही, तोपर्यंत मी हार घालणार नाही, साफा घालणार नाही आणि रात्रीचे जेवण करणार नाही'. दरम्यान, साफा ही राजस्थानातील एक पारंपरिक पगडी आहे, जी संस्कृतीचे प्रतीक मानली जाते.
#WATCH | "I have taken a resolution that until we uproot Congress party in Rajasthan in 2023 and form BJP govt (in 2023 Rajasthan polls) with absolute majority, I will not wear 'mala' and 'safa' and not have dinner," says Rajasthan BJP chief Satish Poonia in Aligarh. (03.02.2022) pic.twitter.com/n6ki6R2xZe
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 4, 2022
सचिन पायलट यांनीही दिले होते वचन
2023 मध्ये राजस्थानमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास सतीश पुनिया यांनी व्यक्त केला. भाजपचे नेते निवडणूक प्रचारानिमित्त गेल्या दोन दिवसांपासून उत्तर प्रदेशात आहेत. विशेष म्हणजे 2014 मध्ये राजस्थानमधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनीही राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार येईपर्यंत साफा न घालण्याचे वचन दिले होते. डिसेंबर 2018 मध्ये राज्यात काँग्रेसची सत्ता आली, तेव्हा पायलट यांनी साफा घातला होता.
सात टप्प्यात विधानसभा निवडणूक
यंदा उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे.