उत्तर प्रदेशात 3000 टन सोनं सापडलं नाही, जीएसआयनं दावा फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 09:54 PM2020-02-22T21:54:22+5:302020-02-22T21:56:53+5:30
जीएसआयचे महासंचालक एम.श्रीधर यांनी कोलकाता येथून याबाबत माहिती दिली.
कोलकाता: उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्याची बातमी काल सर्वत्र पसरली होती. मात्र, भारतीय भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाने (जीएसआय) याबाबतची माहिती फेटाळून लावली आहे. सोनभद्र जिल्ह्यात सुमारे तीन हजार टन सोने मिळण्याची कोणतीच माहिती नसल्याचे जीएसआयने म्हटले आहे.
जीएसआयचे महासंचालक एम.श्रीधर यांनी कोलकाता येथून याबाबत माहिती दिली. यासंबंधीची माहिती किंवा डेटा जीएसआयकडून कोणालाही दिला जात नाही. जीएसआयने सोनभद्र जिल्ह्यात सोने असल्याचा कोणताही अंदाज वर्तविला नव्हता, असे एम.श्रीधर यांनी सांगितले. ते म्हणाले, "राज्य युनिटसोबत सर्व्हे केल्यानंतर आम्ही कोणत्याही सापडलेल्या धातूची माहिती देतो. आम्ही (जीएसआय, उत्तर विभाग) या भागात 1998-99 आणि 1999- 2000 मध्ये उत्खनन केले होते. त्यासंबंधीचा अहवाल उत्तर प्रदेशच्या डीजीएमकडे सोपविला होता, जेणेकरून ते पुढील कारवाई करू शकतील."
याचबरोबर, सोन्यासाठी उत्खनन करणे समाधानकारक नव्हते. सोनभद्र जिल्ह्यातील सोन्याच्या मोठ्या स्त्रोताचे परिणाम सुद्धा जास्त चांगले नव्हते, असेही एम.श्रीधर यांनी सांगितले. तसेच, जिल्ह्यात सोने शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर आम्ही आमच्या अहवालात असे काहीच म्हटले नाही. अहवालात जीएसआयने 52,806.25 टन धातूंचा अंदाज वर्तविला आहे. तर सोन पहाडीच्या सब ब्लॉक-एचमध्ये प्रति टन धातूचे प्रमाण 3.03 ग्रॅम सोने मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे, असे एम. श्रीधर म्हणाले.
दरम्यान, सोनभद्र जिल्हात सोन्याचे साठे आढळून आले आहेत, असे दोन दिवसांपूर्वी सोनभद्र जिल्ह्याचे खाण अधिकारी के.के. राय यांनी सांगितले होते. 'जीएसआय'च्या अंदाजानुसार सोनपहाडीमध्ये 2700 लाख टन सोने सापडले आहे. तर, हरदीमध्ये 650 लाख टन सोने सापडले आहे, असे के.के. राय यांनी सांगितले होते. मात्र, हा दावा एम. श्रीधर यांनी फेटाळून लावला आहे.