वीज, पाण्याचा पत्ता नाही; आम्ही मतदान करणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 09:17 AM2023-10-13T09:17:34+5:302023-10-13T09:19:47+5:30
अनेक वर्षांपासून या गावांमध्ये पिण्याचे पाणी व वीजपुरवठा या पायाभूत सुविधा उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. त्याचा निषेध करण्याची भूमिका या गावांनी घेतली.
कोरबा : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातल्या दोन आदिवासी गावांनी पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून या गावांमध्ये पिण्याचे पाणी व वीजपुरवठा या पायाभूत सुविधा उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. त्याचा निषेध करण्याची भूमिका या गावांनी घेतली.
रामपूर विधानसभा मतदारसंघातील सारडीह आणि बागधारीदंड या गावांनी विधानसभा निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. तेथील गावकरी करत असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व पहाडी कोरबा या आदिवासी संघटनेकडे आहे. गावात रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारी पत्रके सारडीह आणि बगधारीदंड या दोन गावांतील नागरिकांना वितरित करण्यात आली आहेत.
रविवारी प्रार्थना; मतमोजणीची तारीख बदला
ख्रिश्चनधर्मीय रविवारी मोठ्या संख्येने चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जातात. ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाने मिझोराम विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीच्या दिवसात बदल करावा, अशी मागणी भाजप, काँग्रेस तसेच सत्ताधारी एमएनएफ आदी पक्षांनी केली आहे. ३ डिसेंबरला रविवारी मिझोराममध्ये मतमोजणी होणार आहे.