इतर राज्यात नोंद केलेल्या Ola-Uber वाहनांना दिल्लीत 'नो एन्ट्री'; सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 03:06 PM2023-11-08T15:06:02+5:302023-11-08T15:11:58+5:30
दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी ही घोषणा केली आहे.
नवी दिल्ली: दिल्ली-एनसीआरला प्रदूषणाचा तडाखा बसला आहे. प्रदूषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी दिल्लीचे केजरीवाल सरकार रोज नवीन निर्णय घेत आहे. आता दिल्ली सरकारने Uber, OLA आणि इतर राज्यांमध्ये नोंदणी केलेल्या इतर अॅप-आधारित कॅबवर दिल्लीत प्रवेशावर बंदी घातली आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी ही घोषणा केली आहे.
केजरीवाल सरकारच्या या निर्णयानंतर दिल्लीत फक्त नोंदणी असलेल्या अॅप-आधारित कॅब म्हणजेच फक्त DL नंबरच चालतील. गोपाल राय म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अॅपच्या आधारे दिल्लीबाहेर नोंदणी असलेल्या वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दिल्लीतील शाळांना हिवाळी सुट्टी जाहीर-
वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. ९ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत सर्व शाळांमध्ये हिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी, वायू प्रदूषणामुळे, दिल्ली सरकारने १० नोव्हेंबरपर्यंत शाळांमधील शारीरिक वर्ग बंद केले आहेत आणि ऑनलाइन वर्ग घेण्याचे आवाहन केले आहे.
१३ नोव्हेंबरपासून दिल्लीत सम विषम प्रणाली लागू होणार-
दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ, ऍलर्जी अशा आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्लीचे केजरीवाल सरकार विविध पावले उचलत आहे. केजरीवाल सरकारने नुकतेच १३ नोव्हेंबरपासून सम-विषम फॉर्म्युला लागू करण्याची घोषणा केली आहे.
कोणती वाहनं कोणत्या दिवशी धावणार?
- Odd क्रमांक असलेल्या कार म्हणजेच ज्या कारचा क्रमांक शेवटचा अंक आहे (१, ३, ५, ७, ९) - १३, १५, १७, १९ नोव्हेंबर रोजी धावतील.
- Even क्रमांकित कार, म्हणजे ज्या कारचा क्रमांक शेवटच्या अंकाने सुरू होतो (०, २, ४, ६, ८, ० ) - १४, १६, १८, २० नोव्हेंबर रोजी धावतील.