लोकांच्या जीवापेक्षा आर्थिक नुकसान महत्वाचं नाही, लॉकडाउन ३ मेपर्यंत राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 05:44 AM2020-04-15T05:44:12+5:302020-04-15T05:44:51+5:30
पंतप्रधानांची घोषणा : यापुढे प्रत्येक मृत्यू व प्रत्येक संसर्ग रोखावाच लागेल
नवी दिल्ली : कोरोना साथीला आळा घालण्यासाठी आतापर्यंत योजलेल्या उपायांना बऱ्यापैकी यश आले असले तरी अजूनही नवे संसर्ग व नवे मृत्यू होतच आहेत. त्यामुळे काबूत येत असलेल्या या साथीला पुन्हा डोके वर काढायला जराही वाव मिळी नये यासाठी देशव्यापी ‘लॉकडाउन’ येत्या ३ मेपर्यंत वाढविण्याची गोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. यापुढे प्रत्येक मृत्यू व प्रत्येक संसर्ग रोखणे हेच उद्दिष्ट असल्याने ‘लॉकडाउन’चे निर्बंध अधक कडक केले जातील, असेही मोदींनी जाहीर केले. त्यामुळे महाराष्ट्रासह ज्या नऊ राज्यांनी याधीच ‘लॉकडाऊन’ ३० एप्रिलपर्यंत सुरु ठेवायचे ठरविले होते तेथेही आता ३ मेपर्यंत ‘लॉकडाउन’ लांबेल.
अशा प्रदीर्घ ‘लॉकडाउन’मुळे देशाला मोठी आर्थिक किंमत मोजावी लागत आहे. पण संकटात असलेल्या लोकांच्या जीवांपुढे ही किंमत काहीच नाही, असेही मोदी म्हणाले. घोषणा ‘लॉकडाउन’ सरसकटपणे ३ मेपर्यंत वाढविण्याची केली असली तरी काही ठिकाणी आठवड्यानंतर म्हणजे २० एप्रिलनंतर निंर्बंध थोडेफोर शिथिल करण्यासही बाव ठेवला आहे. मोदी म्हणाले की, ‘लॉकडाउन’चे किती कसोशीने पालन केले व कोरोनाला आळा घालण्यात किती यश आले याचे प्रत्येक राज्य-जिल्हा-गाव-शहरनिहाय मूल्यपान होईल. जे यात पास होतील, जे ‘हॉटस्पॉट’ वर्गात नसतील व जेथे नव्या ‘हॉटस्पॉट’ची शक्यता नसेल तिथे काही व्यवहार सुरु करण्याची परवानगी २० एप्रिल नंतर दिली जाऊ शकेल.