मोर्चांमध्ये भडक भाषणे नको, CCTV बसवा; हरयाणा हिंसाचार SCचे निर्देश; मृतांची संख्या ६
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 06:27 AM2023-08-03T06:27:34+5:302023-08-03T06:29:16+5:30
हिंसाचारात आतापर्यंत दोन होमगार्डसह सहा जणांचा मृत्यू झाला. नूहमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे निमलष्करी दलाच्या आणखी तीन तुकड्यांची मागणी केली.
बलवंत तक्षक -
चंडीगड/नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) आणि बजरंग दलाच्या वतीने हरयाणातील नूह येथील हिंसाचाराच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चादरम्यान कोणत्याही प्रकारची भडक भाषणे होऊ नयेत, अशा भाषणांमुळे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होऊ शकताे. यासाठी जादा सुरक्षा बल मागवावे, तसेच संवेदनशील
परिसरात सीसीटीव्हीची देखरेख ठेवून त्यातील फुटेज सुरक्षित राहील, याची तजवीज करावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बुधवारी दिले.
जादा सुरक्षाबलाची मागणी
हिंसाचारात आतापर्यंत दोन होमगार्डसह सहा जणांचा मृत्यू झाला. नूहमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे निमलष्करी दलाच्या आणखी तीन तुकड्यांची मागणी केली.
न्यायाधीशांची कार पेटवली, कसाबसा वाचला जीव
हरयाणात सोमवारी काही बदमाशांनी नूह न्यायाधीशांच्या वाहन चारही बाजूंनी घेरून पेटवून दिले. तेव्हा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, तीन वर्षांची मुलगी कारमध्ये होते. बसस्थानक वर्कशॉपमध्ये लपून सर्वांनी कसा तरी जीव वाचवला.
संवेदनशील ठिकाणी
कडक सुरक्षा व्यवस्था
नवी दिल्लीतील संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. या हिंसाचाराच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी नवी दिल्लीत अनेक ठिकाणी निदर्शने केली.
सरन्यायाधीशांनी घेतली दखल
याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेतील मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तातडीने दखल घेत हरयाणा हिंसाचारप्रकरणी न्यायाधीशांचे विशेष पॅनल गठित करण्याचे निर्देश दिले. पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे. आतापर्यंतच्या हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू झाला असून, ११६ जणांना अटक करण्यात आली आहे.