विदेशात उड्डाण नाहीच, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक 31 जुलैपर्यंत बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 02:32 PM2021-06-30T14:32:13+5:302021-06-30T14:33:12+5:30
देशातील करोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनाल (डीजीसीए) ने आज नवीन निर्बंध जारी केले आहेत.
नवी दिल्ली - रेल्वेनंतर आता आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीबाबत आज घेतलेल्या निर्णयानुसार, देशातून परदेशात जाणारी तसेच परदेशातून देशात होणारी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे, विदेशात जाण्यासाठी भारतीय नागरिकांना आणखी एक महिना वाट पहावी लागणार आहे.
देशातील करोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनाल (डीजीसीए) ने आज नवीन निर्बंध जारी केले आहेत. त्यानुसार, यापूर्वी ३० जूनपर्यंत विमान वाहतुकीवरील बंदी वाढवून 31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशातील कोरोनाचे संकट आणि विदेशातही वाढत असलेला डेल्टा व्हायरसमुळे सरकाने हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.
Restrictions on scheduled international passenger flights to/from India extended till July 31st, 2021: Directorate General of Civil Aviation (DGCA) pic.twitter.com/tYCv5P80Oi
— ANI (@ANI) June 30, 2021
आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर बंदी असली तरी विमानांद्वारे होणारी मालवाहतूनक व कार्गो ऑपरेशन कुरिअर सेवा सुरू राहणार आहे. तर, 31 जुलैनंतर बंदीला मुदतवाढ द्यायची की नाही याबाबत, तेव्हाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. कोणत्याही देशासोबतच्या मालवाहतूक व कुरिअर सेवेवर बंदी घालण्यात आलेली नाही, सुरक्षा नियम व कोविड नियमांचे पालन करत ही वाहतूक सुरू असल्याची माहितीही परिपत्रकात देण्यात आली आहे.
दरम्यान, वंदे भारत मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष प्रवासी विमानांची वाहतूक सुरू आहे. याशिवाय एअर बबल करारानुसार प्रवासी विमानांची वाहतूक सुरू आहे.