सिलिंडरवर जीएसटी नकोच, काँग्रेसची मागणी

By Admin | Published: July 5, 2017 01:30 AM2017-07-05T01:30:04+5:302017-07-05T01:30:04+5:30

घरगुुती सिलिंडरवर आकारण्यात आलेला ५ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) मागे घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली

No GST on cylinder, Congress demand | सिलिंडरवर जीएसटी नकोच, काँग्रेसची मागणी

सिलिंडरवर जीएसटी नकोच, काँग्रेसची मागणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : घरगुुती सिलिंडरवर आकारण्यात आलेला ५ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) मागे घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या निर्णयाने गरिबांना आर्थिक फटका बसणार असल्याचे मत काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी व्यक्त केले आहे.
माकन म्हणाले की, जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर घरगुती सिलिंडरच्या दरात ३२ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य आणि विशेषत: गरिबांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे घरगुती सिलिंडरवरील जीएसटी त्वरित मागे घेण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. घरगुती गॅस सिलिंडरला ५ टक्क्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आले. यापूर्वी काही राज्यांमध्ये सिलिंडरवर २ ते ४ टक्के व्हॅट आकारण्यात येत होता.
माकन यांनी दावा केला की, विविध प्रकारची पेये, हेल्मेट, हेअर आॅइल, टूथपेस्ट, चहा, कॉफी, बटर, दही, सिमेंट आणि मिनरल वॉटर यांचे दर वाढले आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर या वस्तूंचे दर कमी होतील, असा शब्द सरकारने दिला होता. तरीही या वस्तंूच्या दरात वाढ झाली आहे.


ग्राहकांना लाभ नाही

अजय माकन म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतरही सरकारने याचा
लाभ देशातील नागरिकांपर्यंत पोहचवला नाही.
इंधनाच्या दरात कपान न करता सरकार दर वर्षी तीन लाख कोटींचा नफा मिळवत आहे. एकीकडे नफा मिळविला जात आहे तर, दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरवर कर आकारला जात आहे. जीएसटीचा उल्लेख त्यांनी ‘गयी सेव्हिंग तुम्हारी’ असा केला.

सहा वर्षांतील सर्वाधिक वाढ

जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर  घरगुती सिलिंडरच्या दरात ३२ रुपयांची वाढ झाली असून, ही सहा वर्षांतील सर्वाधिक वाढ आहे. नवी दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ४४६.६५ रुपयांवरून ४७७.४६ रुपये झाली आहे.
यापूर्वी दिल्ली, चंदीगढ, हरियाणा, जम्मू-काश्मीर, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि काही ईशान्येच्या राज्यांत सिलिंडरवर १ ते ५ टक्के व्हॅट वा विक्री कर आकारण्यात येत होता.
उर्वरित देशात शून्य टक्के कर होता. आता सबसिडी असलेल्या सिलिंडरवर हा कर ५ टक्के असेल. मुंबईमध्ये पूर्वी सिलिंडरवर ३ टक्के व्हॅट आकारण्यात येत होता.

मुंबईत सिलिंडरच्या दरात १४.२८ रुपये वाढ होऊन सिलिंडरची किंमत ४९१.२५ रुपये झाली आहे. प्रत्येक कुटुंबाला दर वर्षी १४.२ किलोचे १२ सिलिंडर या दराने मिळतात. विनाअनुदानित सिलिंडरचे दर दिल्लीत ११.५ रुपयांनी वाढून ५६४ रुपये झाले आहेत.

Web Title: No GST on cylinder, Congress demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.