'भूक का कोई मजहब नही होता साहंब', सहा वर्षांपासून गरिबांची भूक भागवतायंत अजहर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 05:48 PM2018-10-30T17:48:32+5:302018-10-30T17:51:21+5:30
'भूक का कोई मजहब नही होता', हेच अहजर यांच ब्रीदवाक्य आहे. भाकरीवर सर्वांचाच अधिकार आहे. त्यामुळे भुकेली व्यक्ती कुठल्या जातीची, पंथाची किंवा धर्माची आहे,
हैदराबाद - सय्यद उस्मान अजहर मकसुसी यांनी माणुसकीचा धर्मच सर्वात मोठा असतो, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले. हैदराबाद येथील सय्यद उस्मान हे गेल्या 6 वर्षांपासून सातत्याने गरीब, पीडित आणि वंचितांची भूक भागवतात. विशेष म्हणजे दररोज 300 ते 400 लोकांना ते मोफत जेवण देतात. शहरातील दबीरपुरा फ्लायओव्हरजवळ ते दररोज ही सेवा देताना तुम्हाला पाहायला मिळतील.
हैदराबादच्या दबीरपुरा फ्लायओव्हरजवळील गरीब, भिकारी, बेघर, कचरा विकणारे, मजूर आणि गरजू लोक दररोज दुपारी सय्यद उस्मान याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. दुपारचे 12.30 वाजताच, सय्यद या जागेवर पोहोचतात. त्यानंतर, सुरू होते मोफत अन्नदान. गरम गरम भात आणि दाळ या गरजू व भूकेल्यांच्या पोटात घालण्याचे पवित्र काम सय्यद यांच्याकडून केलं जातं. गरीब आणि भुकेल्यांची भूक शांत करणं हेच अहजर यांच्या आयुष्याच उद्दिष्ट बनल्याचं दिसून येतंय.
'भूक का कोई मजहब नही होता', हेच अहजर यांच ब्रीदवाक्य आहे. भाकरीवर सर्वांचाच अधिकार आहे. त्यामुळे भुकेली व्यक्ती कुठल्या जातीची, पंथाची किंवा धर्माची आहे, याचा काहीही फरक पडत नसल्याचे उस्मान यांनी म्हटले. लहानपणी पैशांची कमरतता असल्यामुळे अनेकदा माझे कुटुंब उपाशीपोटी झोपलंय. सहा वर्षांपूर्वी एका फ्लायओव्हरजवळ लक्ष्मी नावाची एक महिला भुकेनं व्याकूळ झाली होती, ती रडत होती. त्यावेळी, तिला मी पोटभर जेवण दिलं. त्यामुळे मलाच मोठं समाधान वाटल. तेव्हापासून जमेल तसं पण दररोज मी फ्लायओव्हर खाली बसणाऱ्या गरजुंना अन्न पुरविण्याचं काम हाती घेतलं. सुरुवातीला मी एकटाच यासाठी पुढाकार घेतला. परंतु, नंतर काहीजण माझ्या मदतीला येऊ लागली. कुणी किराणा सामान देऊन तर कुणी अन्य मार्गाने माझ्या या कामाला गती दिली. त्यामुळे मी येथील गांधी जनरल रुग्णालयात उपाशी रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणं देण्याचे काम सुरू केल. सध्या दररोज 300 ते 400 गरजुंना या माध्यमातून अन्न मिळतं, असे अजहर यांनी सांगितल.
विशेष म्हणजे अजहर यांनी आपल्या कामाची व्याप्ती राज्याबाहेरही वाढवली आहे. बंगळुरू, रायचूर, तंदूर, झाखंड आणि आसाम राज्यातही हे काम सुरू केल्याचं अजहर यांनी सांगितल. सध्या या सर्व ठिकाणी मिळून जवळपास 1000 ते 1200 जणांना दररोज जेवण देण्यात येत. त्यामुळे मला सर्वात आनंद होतो, असेही अजहर यांनी म्हटले. विशेष म्हणजे अजहर यांच्या या कामाचे स्वत: सलमान खान आणि बिग बी अमिताभ बच्चन यांनीही कौतूक केलं आहे.