लसीकरणात कोणतंही 'If and But' नको; जाणून घ्या का म्हणाले पंतप्रधान मोदी असं ?
By जयदीप दाभोळकर | Published: January 11, 2021 07:19 PM2021-01-11T19:19:13+5:302021-01-11T19:21:20+5:30
या व्यापक लसीकरण मोहिमेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता, पंतप्रधानांचं वक्तव्य
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली होती. आता येत्या १६ जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. तसंच सुरूवातीच्या टप्प्यात ३ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सना ही लस दिली जाणार आहे. लसीकरणापूर्वी त्यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली. तसंच आपल्या संबोधनादरम्यान लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून याबाबत कोणतीही शंका नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच या व्यापक लसीकरण मोहिमेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता असल्याचं मोदी म्हणाले.
भारताची कोरोनाविरोधातील लढाई आता एका निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे. आपण १६ जानेवारीपासून जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करत आहोत, असं मोदी यावेळी म्हणाले. तसंच त्यांनी कोरोनाचा सामना केल्याबद्दल आपल्या सरकारचं कौतुकही केलं. या मोठ्या संकटादरम्यान सर्वांनी एकत्र मिळून काम केलं. लवकर निर्णयही घेतले गेले. दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारतात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
"लसीकरणाबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरण्यापासून त्या रोखण्याची जबाबदारी ही राज्यांची आहे. आपल्या सतर्क राहावं लागणार असून अफवा पसरण्यापासून थांबवाव्या लागतील," असंही ते म्हणाले. देशातील आणि जगातील काही घटक या मोहिमेत बाधा आणण्याचे प्रयत्न करतील. परंतु अशा प्रत्येक प्रयत्नांना देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत योग्य माहिती पोहोचवून त्यांचे प्रयत्न हाणून पाडायचे आहेत," असंही त्यांनी सांगितलं.
ज्या लसींच्या आपात्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे त्या स्वदेशी बनावटीच्या आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. भारताच्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये ड्राय रन पूर्ण करण्यात आला आहे. ही एक मोठी बाब आहे. तसंच आपल्या जुन्या अनुभवातून नव्या एसओपींना पुढे नेत असल्याचंही पंतप्रधान म्हणाले.