सहा महिन्यांत चीनकडून घुसखोरी नाही, गृहराज्यमंत्र्यांचे राज्यसभेत लेखी उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 12:25 AM2020-09-17T00:25:09+5:302020-09-17T06:21:35+5:30
लेखी उत्तरामुळे भारताची राजनैतिक अडचणही झाली आहे. चिनी व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून संसदेतील चर्चेपर्यंत संदर्भ देत आहेत.
नवी दिल्ली : ईशान्य लडाख सीमेवर नेमके काय सुरू आहे, याची संदिग्धता केंद्र सरकारनेच वाढवली आहे. गेल्या सहा महिन्यांत भारत- चीन सीमेवर चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न झालाच नसल्याचे केंद्र सरकारने लेखी उत्तरात म्हटले आहे.
लेखी उत्तरामुळे भारताची राजनैतिक अडचणही झाली आहे. चिनी व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून संसदेतील चर्चेपर्यंत संदर्भ देत आहेत. राज्यसभेत भाजप खासदारानेच विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी हे उत्तर दिल्याने विरोधकही आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे भारतीय लष्कर, परराष्ट्र मंत्रालयानेदेखील चीनकडून यथास्थिती (स्टेटस को) बदलण्याचा प्रयत्न झाल्याचे व भारताने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे वारंवार म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील भारतीय हद्दीत चीन घुसखोरीचा प्रयत्न करीत असल्याचे लोकसभेत स्पष्ट केले होते. आता मात्र लेखी उत्तरामुळे परस्परविरोधी भूमिका समोर आली आहे.
गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या उत्तरात पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. पाकिस्तानने घुसखोरीचा एप्रिलमध्ये सर्वाधिक प्रयत्न केला. जवानांनी तो हाणून पाडला. चीनकडून मात्र घुसखोरी झाली नसल्याचे म्हटले आहे. चीनसमवेत भारताचे संबंध ताणले गेले आहेत. सीमेवर सशस्त्र जवान चीनला धडा शिकवण्यासाठी तयार आहेत. राजनैतिक, राजकीय, चर्चा निष्फळ होताना दिसत असल्याने सीमा भागात युद्धस्थिती असल्याचे सरकारकडूनही संकेत मिळत आहेत. मंगळवारी लोकसभेत राजनाथ सिंह म्हणाले होते की, चीनने अनेकदा घुसखोरीची प्रयत्न केला. सीमेवर अनेकदा तणाव निर्माण होतो; पण संवादाने, चर्चेने त्यावर मात करता येत. आता चीनने या भागात कुमक वाढवली आहे. १९५० पासून सीमा प्रश्न सोडविण्यासाठी भारताने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली.