राममंदिर प्रतिष्ठापनेचे नेत्यांना निमंत्रण नाही; पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवत असणार प्रमुख पाहुणे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 07:51 AM2023-11-11T07:51:20+5:302023-11-11T07:51:35+5:30

चार हजार साधुसंतांसह आठ हजार खास लोकांना पाठविणार निमंत्रण

No invitation to leaders for Ram Mandir installation; Prime Minister Modi, Sarsanghchalak Bhagwat will be the Chief Guest | राममंदिर प्रतिष्ठापनेचे नेत्यांना निमंत्रण नाही; पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवत असणार प्रमुख पाहुणे

राममंदिर प्रतिष्ठापनेचे नेत्यांना निमंत्रण नाही; पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवत असणार प्रमुख पाहुणे

- संजय शर्मा/राजेंद्र कुमार

नवी दिल्ली/अयाेध्या : अयोध्येत दि. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राममंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी देशातील कोणतेही मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपालांसह कोणत्याही नेत्याला निमंत्रण दिले जाणार नाही. श्री राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. अर्थात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कार्यक्रमास उपस्थित राहतील. ते आयोजन समितीत आहेत.
रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी अनौपचारिक चर्चेत सांगितले की, राममंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी ८००० विशिष्ट लोकांना निमंत्रण पाठविण्यात येईल. यात ४००० साधुसंतांचा समावेश असेल. सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमात मुख्य अतिथी असणार आहेत. आंबेकर यांनी सांगितले की, संघ व विहिंप कार्यकर्ते एक जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत देशाच्या प्रत्येक गावात, शहरात राम मंदिराच्या छायाचित्रासह अक्षता घेऊन निमंत्रण देण्यास जाणार आहेत. राममंदिर आंदोलनाशी संबंधित सर्व प्रमुख लोकांना बोलावण्यात येणार आहे. नेत्यांना निमंत्रण न देण्यामागचे कारण सांगताना अंबेकर म्हणाले की, मंदिराचे काम अद्याप पूर्ण नाही. व्हीआयपीच्या येण्याने व्यवस्थेवर ताण पडू शकतो.

अयोध्या सजली : अयोध्येतील रामजन्मभूमी येथे उभारण्यात येणाऱ्या राममंदिरातील गर्भगृहात दिवाळीनिमित्त झेंडूच्या फुलांच्या हारांची सजावट करण्यात आली आहे. तसेच भगव्या रंगाच्या पताकांनी हा परिसर सुशोभित केला आहे. राममंदिराच्या उभारणीत व्यग्र असलेल्या कामगारांनीही या मंदिरात सजावट करण्यास हातभार लावला. अयोध्येतील शरयू तीरावर लाखो पणत्या उजळून यावेळीही विक्रम करण्यात येणार आहे. त्याची तयारी झाली आहे. 

काँग्रेसच्या दाव्यावर आरएसएसला नाही आक्षेप
अंबेकर म्हणाले की, एक जानेवारीपासून पूर्ण देशात राममय वातावरण तयार होत आहे. ५०० वर्षांच्या लढाईनंतर हा शुभ दिन येत आहे. आता काँग्रेसचे नेतेही दावा करत आहेत की, राममंदिर आमच्यामुळे झाले आहे. राजीव गांधी यांनी त्यावेळी कुलूप उघडले होते. अंबेकर म्हणाले की, संघाला या दाव्याबाबत कोणताही आक्षेप नाही. संघ व विहिंपने हा मुद्दा हाती घेऊन निष्कर्षापर्यंत नेला.

योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची शुक्रवारी भेट घेऊन त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. स्वामी गोविंद देव गिरी महाराज, चंपतराय, राजेंद्र पंकज यांनी शुक्रवारी योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री निवासस्थानी भेट घेतली व त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आज जीवन धन्य झाले. मन प्रफुल्लित झाले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट केले की, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी स्वामी गोविंद देव गिरी महाराज, चंपत राय व राजेंद्र पंकज यांनी प्राणप्रतिष्ठा समारंभाचे निमंत्रण दिले. 

Web Title: No invitation to leaders for Ram Mandir installation; Prime Minister Modi, Sarsanghchalak Bhagwat will be the Chief Guest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.